मुंबई : मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आंतरवाली सराटीमधील पोलीस अधिकारी तुषार दोशींच्या (IPS Tushar Doshi) बदलीला स्थिगिती देण्याची मागणी केलीये. यासंदर्भात केसरकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) पत्र देखील लिहिलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. चौकशी सुरु असलेल्या अधिकाऱ्याची अशा प्रकारे पोस्टिंग करणे चुकीचे असल्याचं केसरकरांनी म्हटलं आहे.


जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी  उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असल्याचा आरोप झाला होता. त्यांमुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत होते. त्यानंतर, या सर्व प्रकरणाची गृह विभागाने गंभीर दखल घेत जालना पोलीस अधीक्षक तुषार दोषी  यांच्यावर पहिली कारवाई केली. पोलीस अधीक्षक दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश गृह विभागाने काढले होते. मात्र, आता दोषी यांची जालना येथून बदली करण्यात आली आहे. तुषार दोषी यांची बदली पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. 


केसरकरांनी काय म्हटलं?


नक्कीच मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिले होते, कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे. त्यातच चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला अशा प्रकारची पोस्टिंग देणे चुकीचे वाटले, त्यांची पोस्टिंग थांबवून काही काळ हेडक्वार्टरमध्ये काम करता येईल.  चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढचे बघता येईल, म्हणून मी ही पोस्टिंग थांबावी यासाठी पत्र लिहिले होते. हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी मला मुख्यमंत्री भेटले आणि त्या दिवशी त्यांना विषय समजावून सांगून मी पत्र देखील दिले. जर तेव्हा देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असते तर त्यांना देखील मी हे पत्र दिले असते आणि हा विषय समजावून सांगितला असता


प्रत्येक वेळी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बदली करतात असं नाही


प्रत्येक वेळी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच बदली करतात असे नाही. तर अनेक वेळा या बदल्या प्रशासनामार्फत देखील होत असतात, असं स्पष्टीकरण देखील मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिलं. दरम्यान केसरकरांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे आरोप देखील खोडून काढलेत. डेट्टीवर यांचे आरोप पूर्णतः चुकीचे आहेत. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रितरित्या काम करतायत. हे सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पूर्णतः प्रयत्नशील आहे. मागच्या सरकारने केलेल्या चुका सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असं केसरकरांनी म्हटलं. 


पुन्हा मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण झाला असता - केसरकर


लाठीचार्ज झाल्यामुळे चौकशीत असलेल्या अधिकाऱ्याला चांगली पोस्टिंग दिली तर मराठा समाजामध्ये पुन्हा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे आंदोलनाची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणूनच हे पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलंय. अजूनही मी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं केसरकरांनी म्हटलं. 


मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना, पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा झाला. त्यानंतर पोलिसांकडून लाठीमार तर आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप झाला. मात्र, त्यानंतर जालन्यात घडलेल्या या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मराठा बांधव  रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले.काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. दुसरीकडे, विरोधकांनीही सरकारवर टीकास्त्र डागले. तर, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी होऊ लागली. त्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला. या सर्व पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर पहिली कारवाई करण्यात आली आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांची जालन्यातून बदली देखील करण्यात आली. 


हेही वाचा : 


Maratha Reservation : मोठी बातमी! अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी सक्तीच्या रजेवरील तुषार दोषींची बदली