एक्स्प्लोर
शौचालयाचा दरवाजा ठोठावण्यावरुन भांडण, मुंबईत एकाची हत्या
फुलचंद बाहेर येताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी रांगेतील इतरांनी मध्यस्थी करुन भांडण सोडवलं.
मुंबई : सार्वजनिक शौचालयाच्या रांगेत उभे असताना दरवाजा ठोठावल्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात एकाची हत्या झाल्याची घटना मुंबईत घडली. वडाळा पूर्व इथल्या संगमनगर भागात बुधवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. फुलचंद रामआयोद्या यादव असं हत्या झालेल्या वृद्धाचं नाव आहे.
वडाळा संगमनगरमध्ये राहणारे फुलचंद रात्री 9.30 च्या सुमारास शौचाला गेले होते. ते नैसर्गिक विधी आटोपत असताना शौचालयात रांगेत उभे असलेल्या शाकीर अली सरमुल्ला शेखने दरवाजा जोराने ठोठावला. तेव्हा वृद्धाने थोडा वेळ थांबण्यास सांगितलं. हे ऐकून शाकीर अलीचा राग अनावर झाला आणि तो आणखी जोरात दरवाजा ठोठावू लागला.
फुलचंद बाहेर येताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी रांगेतील इतरांनी मध्यस्थी करुन भांडण सोडवलं. यानंतर फुलचंद घराकडे निघाले. परंतु याचवेळी बेसावध असलेल्या फुलचंद यांच्या छाती आणि तोंडावर शाकीर अलीने जोरदार ठोसा लगावला. ठोसा बसताच फुलचंद शौचालयालगत वाहणाऱ्या उघड्या नाल्यात पडले. ते पाहून शाकीर अलीने तिथून पळ काढला. शौचालयाजवळ उभ्या असल्याने इतर नागरिकांनी फुलचंद यांना बाहेर काढलं. मात्र शिव रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी शाकीरला काही तासातच बेड्या ठोकल्या. त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर न्यायालयाने शाकीर अलीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement