Coronavirus Covid-19 Omicron : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनने कहर केला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्या पटीने वाढतेय. त्यामुळे भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशात कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ज्या तीन गोष्टींचे पालन करावे लागते त्यातला मुख्य घटक म्हणजे हॅन्ड सॅनिटायझर. आता मुंबई अन्न आणि औषध प्रशासन विभागाची (FDA)नजर याच हॅन्ड सॅनिटायझर्सवर पडली आहे.
मुंबई अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA)नोव्हेंबर 2021 ला मुंबईतील तळोजा परिसरात धाड टाकून जवळपास 19 लाख रूपयांचे हॅन्ड सॅनिटाईझर्स जप्त केले होते. ज्याचे 6 नमुने टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवले होते. याच संदर्भात जे रिपोर्ट्स समोर आलेले आहेत ते अक्षरश: थक्क करणारे आहेत.
मुंबई अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA)असिस्टंट कमिशनर गणेश रोकडे यांनी असे सांगितले की, हे सगळे सॅनिटाईझर्स बनावट आहेत. यांचा वापर करण्यात काही अर्थ नाही. त्याचबरोबर रोकडे यांनी असे सांगितले की, सामान्य व्यक्तीला हे हॅन्ड सॅनिटाईझर्स खरे आहेत की खोटे हे ओळखणंदेखील कठीण आहे.
मुंबईत दिवसाला जवळपास 20,000 हून अधिक कोरोनाबाधितांची संख्या समोर येतेय. देशाला ही चिंता तर आहेच पण यामागचं खरं कारण असंही आहे की जेव्हा कोरोनाबाधित रूग्णांच्या केसेस कमी झाल्या होत्या तेव्हा लोकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केला होता. आता ज्या वेगाने रूग्णांची संख्या वाढतेय लोकांनी पुन्हा एकदा सॅनिटायझर वापरायला सुरुवात केली आहे.
मुंबई अन्न आणि औषध प्रशासनाने 21 नोव्हेंबरला टाकलेल्या धाडीत जे सॅनिटायझर्स जप्त केले होते त्यांचा रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्ट्सनुसार हे सर्व सॅनिटायझर्स बनावट असल्याचं समजतं आहे. याचाच अर्थ कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्या जंतुविरहित एंटीबॅक्टीरियल सॅनिटायझरची गरज असते तो पदार्थ या सॅमप्ल्समध्ये आढळून आला नाही.
गणेश रोकडे यांनी असे सांगितले की, सामान्यत: चांगल्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल, इथेनॉल आणि हायड्रोजन पॅरोक्साईडसारखे केमिकल काही प्रमाणात असावे लागतात. परंतु, हे केमिकल्स फार महाग असतात. त्यामुळे बनावटखोर यामध्ये इथेनॉलच्या जागी इंडस्ट्रियल वापरासाठी वापरण्यात येणारे मिथेनॉलचा वापर करतात. जे इथेनॉलच्या तुलनेत फार स्वस्त असतात.
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, मिथेनॉलमध्ये कोणत्याच प्रकारचे जंतुविरहित घटक नसतात. याउलट, यांच्या वापराने हातांना जळजळ आणि त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतो. रोकडे यांनी असेही सांगितले की कित्येक सॅम्पल्समध्ये मिथेनॉलचासुद्धा वापर केला गेला नव्हता. त्यामध्ये फक्त सुगंधित तेलाचा वापर करून ते विकले होते. त्यामुळे तुम्ही जेव्हाही सॅनिटायझर घ्यायला मेडिकलमध्ये जाल तेव्हा त्यावर लिहिलेली माहिती, उत्पादनाची तारीख, निर्मात्याचे नाव आणि त्याचा लायसन्स नंबर नीट तपासून घेणे तसेच सॅनिटायझरचे बिलदेखील मागणे गरजेचे आहे असे FDA अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा -
- Police Corona : पोलिसांना कोरोनाचा विळखा, एका दिवसात 93 पोलीस कोरोनाबाधित
- Omicron : लस न घेतलेल्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका! ऑक्सिजन बेडवरील 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण लस न घेतलेले
- Coronavirus Updates :काही दिवसात मुंबई, दिल्लीत कोरोनाचा जोर! 'सूत्र' मॅाडेलनुसार तिसऱ्या लाटेची परमोच्च पातळी 'या' काळात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha