मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह, मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, टास्क फोर्सचे सदस्य आणि आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते.


सध्या राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्याचा ताण रुग्णालयावर पडत नसल्याने लगेच मोठा निर्णय घेण्याची गरज नसल्याची बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी काही निर्णय घेण्यावर एकमत झाले आहे. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने नवीन नियमावली रात्री जाहीर झाली नाही. मात्र, या चर्चेनंतर आज नवीन नियमावली जाहीर होणार आहे. त्यामुळे आता नवीन नियमावली काय असणार, आणखी निर्बंध कडक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात शुक्रवारी एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.  शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971  रुग्णांची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून हजारांच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या शुक्रवारी फक्त 790 ने वाढली होती. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यामुळे आता, त्याचा परिणाम राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे समोर येत आहे. राज्यात सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. हीच मागणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत  दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टनची आवश्यकता होती. ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी राज्यात पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: