Mumbai : मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारकडून विकासकामांना गती, 320 कामांचं केलं भूमीपूजन
Mumbai: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) विकासकामांना चालना देण्याचं काम राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहे.
Mumbai: ''मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार असून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांद्वारे प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज म्हणाले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत अतिरिक्त 320 कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज झाले. चेंबूर (पश्चिम) मध्ये टिळक नगर परिसरातील लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे हा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री असं म्हणाले आहेत.
मुंबईला स्वच्छ आणि निरोगी करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले (Eknath Shinde) की, मुंबईला स्वच्छ सुंदर आणि निरोगी करायची आहे. त्यासाठी समुद्र किनारे, सार्वजनिक जागा आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईतील नागरिकांचे दैनंदिन जीवनात सुधारणा होईल. मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. ज्यामुळे मुंबईतील नागरिकांचे दैनंदिन जीवनमान उंचावले जाईल.
रखडलेल्या प्रकल्पांना गती
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना दिली. म्हाडा , उपकर प्राप्त इमारती, एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. मुंबईतील रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण करणार असून येत्या दोन वर्षांत एकही खड्डा दिसणार नाही, असे काम करणार आहोत.
मुंबई सुशोभीकरणअंतर्गत अतिरिक्त ३२०कामांचे भूमिपूजन,रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणातील ५२किमी लांबीच्या १११कामांचा प्रारंभ,मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि मा.उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले.#TransformingMumbai pic.twitter.com/Jlf2KqJlEw
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 26, 2023
नागरी समस्यांवर उपायांसाठी प्रकल्प
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मुंबईतील नागरी समस्या दूर करण्यासाठी सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईचे परिवर्तन करण्यासाठी प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत. मुंबई महापालिकेकडे असलेला निधी नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खर्च केला जात आहे.
ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीवर भर
मुंबईत व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, असे सांगून ते म्हणाले, मुंबईतील (Mumbai) सार्वजनिक जागा राज्य शासन विकसित करणार. समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी उपक्रम राबविणार आहे. मुंबईच्या ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी वर भर देण्यात येत आहे. यासाठी विविध ठिकाणी भुयारी मार्ग विकसित करण्यात येत आहेत. रेल्वे आणि मेट्रो रेल्वे चे जाळे विकसित केले जात आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रास्ताविक केले. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, एकूण 52 किलोमीटर लांबी असलेल्या 111 रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ तसेच, टिळक नगर, नेहरु नगर व सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांचे आज भूमिपूजन झाले.