मुंबई: मुंबईतील डबेवाल्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. डबेवाल्यांच्या घराचा प्रश्न आता सुटणार असून त्यांना परवडेल अशा किमतीत राज्य सरकारकडून घरं उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिली. 


राज्य सरकारकडून मुंबईतील डबेवाल्यांचा डेटा गोळा करण्यात येत असून हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या मार्गाजवळ त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न असेल. 


भाजप आमदार श्रीकांत भारतीय याबाबत बोलताना म्हणाले की, डबेवाले तिन्ही मार्गावर काम करतात, त्यामुळे त्यांना तिथे त्याच ठिकाणी घरे उपलब्ध करून देणार आहोत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी अशी गेल्या कित्येक वर्षांपासून डबेवाले बंधूंची मागणी होती. मी अधिवेशनात हा विषय मांडला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज बैठक बोलावून डबेवाल्यांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सरकारला डब्बेवाल्यांचा डेटा देणार आहोत.


श्रीकांत भारतीय पुढे म्हणाले की, कोरोनापूर्वी डबेवाल्यांची संख्या 50 हजार इतकी होती. कोरोनानंतर ती कमी झाली, आता पुन्हा त्यात वाढ होत आहे. आता आपण त्यांना घर देण्याचा निर्णय घेत आहोत. डबेवाला भवन इमारत देखील मुंबईत आहे. ते भवन आंतरराष्ट्रीयस्तरीय करण्यात येईल. डबेवाला बंधूंना सोयीचे असेल त्या ठिकानी घरे द्यायची असून, ती कुणाच्या माध्यमातून द्यायची याचा विचार लवकरच होईल. हे सरकार संवेदनशील सरकार आहे. त्यामुले डबेवाल्यांना परवडेल याचा विचार करण्यात येईल. डबेवाला घराच्या किमतीबाबत संवेदनशील पणे विचार होईल. 


Mumbai Dabbawala Management : डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे जगभर कौतुक


मुंबई डबेवाल्यांचा 130 वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. लोकल ही जशी मुंबईची लाइफलाइन आहे, तशीच ती डबेवाला लाइफलाइन आहे.  सकाळी 9 ते सायंकाळी 5  या वेळेत लोकलची गर्दी,  मुंबईचं ट्रॅफिक अशा साऱ्याच समस्यांतून ग्राहकांपर्यंत डबे पोहोचवण्याचे कठीण काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे जगभर कौतुक झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा बिनबोभाटपणे सुरू आहे.  'ग्राहक हाच आमचा राजा आहे’ अशा वृत्तीने सेवा देण्याचे कार्य सुरू असते. 


मुंबईतल्या नोकरदारांचं दुपारचं जेवण हे मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांवर अवलंबून आहे. मुंबईतल्या कार्यालयांमध्ये जेवण पोहचवण्याचं काम हे डबेवाले  करत असतात. 


ही बातमी वाचा: