Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वैश्विक शिक्षण मिळावे आणि हे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात सतत पुढे राहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्न करत असते आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने अमेरिकन शैक्षणिक संस्था खान अकादमी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये खान अकादमीकडून या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयाचे विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग नवनवीन उपक्रम राबवत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात या करारावर मंगळवारी (13 जून) स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार आणि खान अकादमी इंडियाच्या भारतातील संचालिका स्वाती वासुदेवन यावेळी उपस्थित होत्या, त्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमधून शिक्षण दिले जाते. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराथी, तामिळ, तेलुगु, कन्नड आदी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळांची संख्या 1,146 असून, सुमारे 3 लाख 18 हजार विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. तसेच खासगी प्राथमिक अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांची संख्या 1,098 असून, या शाळांमध्ये 3 लाख 74 हजार 195 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मिशन ॲडमिशन, मिशन मेरिट असे उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांबाबत अधिक आवड निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून पालिकेने अमेरिकन शैक्षणिक संस्था खान अकादमीसोबत सामंजस्य करार केला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच या कराराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


असा आहे सामंजस्य करार


खान अकादमी ही एक प्रसिद्ध अमेरिका स्थित शैक्षणिक संस्था आहे, या संस्थेने नुकताच महाराष्ट्र शासनासोबतही शैक्षणिक करार केला आहे. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत या संस्थेने करार केला आहे. त्यानुसार इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने गणित आणि विज्ञान विषय अधिक प्रभावशाली पद्धतीने शिकवण्यात येणार आहे. या करारानुसार विद्यार्थ्यांसह काही शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून काही ठराविक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि माधियमिक शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले.


हेही वाचा:


MPSC News : प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI