Mumbai Crime : मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन कैद्यांविरोधात (Inmate) लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तुरुंगात असलेल्या 23 वर्षीय कैद्याच्या तक्रारीनंतर एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोन कैद्यांनी अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप कैद्याने केला आहे.
विभागीय पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. रविवारी (11 जून) संध्याकाळी उशिरा एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
तुरुंगातील शौचालयात लैंगिक अत्याचार
ही कथित घटना 9 जून रोजी घडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 9 जून रोजी इतर कैदी झोपलेले असताना तुरुंगातील शौचालयात संबंधित दोन कैद्यांनी तक्रारदार कैद्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. यानंतर दोघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि घटनेबद्दल वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोन्ही कैद्यांविरोधात गुन्हा दाखल
पीडित कैद्याने रविवारी (11 जून) तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर ही बाब त्याने आपल्या वकिलाला सांगितली. यानंतर एन एम जोशी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर दोन कैद्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 377, 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप कैद्याने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.
पीडित कैदी पॉक्सो प्रकरणात अटकेत
समीर शब्बीर शेख उर्फ पुडी (वय 22 वर्षे) आणि रशीद हसन फराज (वय 36 वर्षे) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होते आणि तेव्हापासून ते आर्थर जेलमध्ये आहे. तर पीडित कैद्याला पॉस्को प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तो एप्रिल 2023 पासून तुरुंगात आहे. तक्रारदार हा आर्थर रोड कारागृहातील सर्कल क्रमांक तीनमधील बॅरेक क्रमांक सहामधील कैदी आहे.
कैद्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
दरम्यान पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी पीडित कैद्याची वैद्यकीय तपासणी केली असून त्याच्या अहवालाची वाट पाहत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.
हेही वाचा