मुंबई: बेस्ट प्रशासनातील महिला वाहकांना दररोज खूप आव्हानांना तोंड द्यावं लागतं. खराब स्वच्छतागृह, विश्रांती कक्षांचा अभाव, प्रवाशांकडून मिळणारी अरेरावीची वागणूक अशा अनेक आव्हानांशी झुंजत या महिला मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत असतात. त्यांच्या कार्याला मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे सलाम करण्यासाठी मी इथे आली आहे, असं सांगत मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी धारावी आगारातील महिला वाहकांसोबत संवाद साधला. या वेळी महिला वाहकांनीही मनमोकळेपणे आपल्या समस्या त्यांच्या कानांवर घातल्या. लवकरच मुंबई काँग्रेस या सर्व प्रश्नांना वाचा फोडेल, अशी ग्वाहीदेखील वर्षा गायकवाड यांनी दिली.


मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड विविध क्षेत्रांमधील महिलांच्या भेटी घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून त्या धारावी आगारातील महिला वाहकांच्या भेटीला गेल्या. या भेटीदरम्यान त्यांनी पुष्पगुच्छ देत या महिलांचा, त्यांच्या कष्टाचा आणि कर्तृत्त्वाचा सन्मान केला. या वेळी आगार व्यवस्थापक फ्रान्सिस आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.


या वेळी महिला वाहकांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. दिवसभर हजारो लोकांमध्ये तुम्ही वावरता. अनेकदा महिला रस्त्यावरून चालतानाही अंग चोरून चालतात. पण तुम्ही महिला वाहक खच्चून भरलेल्या बसमध्येही आपलं कर्तव्य करण्यासाठी कोणतीही कसूर ठेवत नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागले असतील, याची मला खूप कल्पना आहे, असं आ. गायकवाड म्हणाल्या.


या वेळी महिला वाहकांनीही त्यांना दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणी वर्षा गायकवाडांकडे बोलून दाखवल्या. आगारातील स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ आहे. तसंच विश्रांती कक्षात फक्त दोन बाक आहेत. ते पुरेसे नाहीत. तसंच या वाहकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसते. अनेकदा चौकीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने महिलांना पुरुषांसाठीच्या प्रसाधनगृहात जाण्याची वेळ येते. तसंच प्रवासीदेखील खूप वेळा अपमानास्पद वागणूक देतात, असा समस्यांचा पाढा या महिला वाहकांनी वाचला.


लवकरच वाचा फोडणार


यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "महिला वाहकांची ही स्थिती खूप बिकट आहे. त्यांना प्रशासनाकडून मदतीची गरज आहेच. त्यांच्या या सर्व समस्या आम्ही मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून बेस्टच्या महाव्यवस्थापकांपर्यंत पोहोचवू. पण त्याचसोबत मुंबईकरांनाही आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर असलेल्या या महिला वाहकांच्या कार्याचा योग्य आदर करणं गरजेचं आहे." 


ही बातमी वाचा: