मुंबई: दिल्लीत मोदी सरकारने संसदेची नवी इमारत उभी केल्यानंतर राज्य सरकारही त्याच पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. नव्या संसदेनंतर आता नवीन विधानभवनही (New Vidhan Bhavan) बांधण्याचा विचार राज्य सरकार करत आहे असं वक्तव्य खुद्द विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) केलं आहे. जेजे स्कूलच्या (Sir J. J. School of Art Mumbai) एका कार्यक्रमात बोलताना राहुल नार्वेकरांनी हे वक्तव्य केलं आहे.
आम्ही विधान परिषद आणि विधान सभेसाठी एक नवीन वास्तू बनविण्याचा विचार करत आहोत आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ असं वक्तव्य राहुल नार्वेकरांनी जेजे स्कूलच्या विद्यार्थ्यांना उद्देशून केलं आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
जेजे स्कूल ऑफ आर्ट्स हे माझ्या मतदार संघात आहे. दक्षिण मुंबईच्या भागात कलेचा एक वेगळाच अनुभव आहे. या विद्यापीठात जे येतात ते स्वतः ला भाग्यवान समजतात. आपल्या देशाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणायसाठी जेजे स्कूलचा मोठा हात आहे.या विद्यापीठाचे विद्यार्थी हे कलेसोबत राजकीय वर्तुळातही आहेत. आम्हाला कधीही काही नवीन काम करायच असेल तर आम्ही जेजे कडे बघतो. विधान भवनाचे रेनोवेशन करायचं होतं तेव्हाही आम्ही या विद्यापीठाचं मार्गदर्शन घेतलं होतं. आता आम्ही विधानपरिषद आणि विधानसभेसाठी एक नवीन वास्तू बनविण्याचा विचार करत आहोत. त्यावेळीही तुमच्याकडेच मार्गदर्शनासाठी येऊ.
खुद्द विधानसभा अध्यक्षांनीच नवीन विधानसभा आणि विधानपरिषद बांधण्याचा विचार राज्य सरकारचा असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे केंद्रातल्या भाजप सरकारने नवीन संसदेची इमारत बांधल्यानंतर आता राज्यातले सरकारही त्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवीन विधानभवनाबद्दल बोलताना राहुल नार्वेकरांनी अधिक काही माहिती दिली नाही. त्यामुळे या संबंधिचा कालावधी मात्र समजू शकला नाही.
केंद्रातल्या मोदी सरकारने संसदेची नवीन इमारत उभी केली आणि गेल्या महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्याचं उद्धाटन करण्यात आलं होतं. नवीन संसदेची इमारत ही जु्न्या इमारतीच्या तुलनेत अधिक विस्तृत आहे. जुन्या इमारतीच्या तुलनेत नवीन इमारतीमध्ये बैठकीच्या जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे. तसेच नवीन इमारत ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सर्व खासदारांना अत्याधुनिक सोई आणि सुविधा मिळतात.
मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय या तीन कॉलेजांचे मिळून आता डी-नोव्हो प्रकारातंर्गत अभिमत विद्यापीठ (डीम्ड विद्यापीठ) स्थापनेची अधिकृत घोषणा आज केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. प्रधान यांनी केंद्र सरकारच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला अभिमत विद्यापीठ घोषित करण्याचा पत्र देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केलं. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट कॅम्पसला भेट दिली. सर ज.जी. कला, वस्तुकला आणि उपयोजित कला महाविद्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर आणि इतर अनेक मान्यवर देखील उपस्थित होते.
ही बातमी वाचा: