मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) (CSMT) स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. प्रवाशांसाठी आता अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहेत. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च केले जाणार आहेत. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतींना धक्का लागू देणार नाही, असं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. सीएसएमटीबरोबरच देशातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवेंनी यांनी दिली. 


 हे पुनर्विकासाचे काम रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (RLDA) द्वारे केले जात आहे. प्रस्तावित नवे डीआरएम कार्यालयाच्या पाया खणण्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आलीये. पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेअंती अहलुवालिया यांची निवड झाली असून यासाठी 2,450 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान प्रकल्प पूर्तीसाठी साधारणपणे चार वर्षांची कालमर्यादा आहे.


अशी होणार कामे


 सीएसएमटी स्थानकावर चार मजल्यांचे नवे डीआरएम कार्यालय उभारण्यात आलंय. दरम्यान दुमजली प्रवासी विश्रामगृह देखील असणार आहे.प्रवासी संबंधित वस्तूंच्या विक्रीसाठी इमारती, पार्सल इमारती असणार आहेत. मेल-एक्स्प्रेस आणि लोकलला जोडणारा डेक निर्माण केला जाईल. अद्यायावत पादचारी पूल, स्कायवॉक उभारणी करण्यात येईल. वारसा इमारतीच्या परिसरात मोकळ्या जागेची निर्मिती केली जाईल. संपूर्ण छताचे नुतनीकरण, रेल्वे स्थानकांलगत संरक्षक भिंत देखील उभारण्यात येणार आहे. 


'ही' कामे पूर्ण


सीएसएमटीचे ड्रोन-रडार-हवाई सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच स्थलांतरित करण्यात येणारी जागेची तपासणी देखील करण्यात आलीये. स्थलांतरित करणऱ्या अॅनेक्स इमारत, पार्सल इमारत, ट्रॅफिक इमारत यांच्या तपशिलाचे संकलन पूर्ण झाले. तसेच फलाट क्रमांक 18 वर कार्यालय देखील तयार झाले आहे. 


'ही' कामे सुरू


या प्रकल्पाचा पूर्ण मुख्य आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच पुनर्विकास जागेभोवती बॅरिकेडिंगचे काम हे 21 टक्के पूर्ण झाले. नव्या डीआरएम कार्यालयाच्या पाया खणण्याचे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे. फलाट क्रमांक 18 जवळ तात्पुरते पार्सल कार्यालय बांधकाम सध्या सुरु आहे. प्रस्तावित नव्या डीआरएम कार्यालयाच्या परिसरात विविध बाबींचे स्थलांतरित करण्यात येईल. 


बांधकामाचं क्षेत्रफळ


4,61,534 चौमी जागेचा विकास
सीएसएमटी एकूण क्षेत्रफळ - 4,61,534 चौ.मी. 
नवीन बांधकाम क्षेत्र- 2,79,507 चौ. मी.
नूतनीकरणासाठी निश्चित क्षेत्र - 1,30,912 चौ. मी.
टर्मिनसलगत मुक्त परिसर - 37,703 चौ. मी.
अन्य आवश्यक बांधकाम – 13,412 चौ. मी.


हेही वाचा : 


Mumbai Airport : मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी देण्याऱ्या तरुणाला त्रिवेंद्रममधून घेतलं ताब्यात, ATS ची मोठी कारवाई