मुंबई : तोतया एनसीबी अधिकारी बनून एका भोजपुरी अभिनेत्रीकडून खंडणी वसूल करण्याचा आणि धमकवण्याचा प्रकार घडला आहे. याच त्रासाला कंटाळून या भोजपुरी अभिनेत्रीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तोतया एनसीबी अधिकारी बनून आलेल्या आरोपींपैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर दोन जणांचा तपास पोलीस करत आहेत. 


जोगेश्वरी भागात राहणारी आणि भोजपुरी चित्रपटात काम करणारे अभिनेत्री आपल्या दोन मैत्रीणींसोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली. 20 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीमध्ये या तोतया एनसीबी अधिकाऱ्यांची रेड पडल्याचं भासवलं आणि कायदेशीर कारवाई पासून वाचायचे असेल 20 लाख  रुपयांची खंडणी मागितली.


कायदेशीर कारवाईपासून आपला बचाव करण्यासाठी या तोतया एनसीबी अधिकाऱ्यांना वीस लाख रुपये कसे द्यायचे असा प्रश्न या अभिनेत्री समोर उभा राहिला. त्या सगळ्या विचारात भोजपुरी अभिनेत्री नैराश्यात गेली आणि 23 डिसेंबरला तिने जोगेश्वरीतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
 
त्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्यानंतर तिच्यासोबत गेलेल्या मित्रांनी ही सगळी कहाणी पोलिसांसमोर मांडली. त्या नंतर स्वतःला अधिकारी म्हणून यावेळी तिला खंडणी मागणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सुरज परदेसी आणि प्रवीण वाळिंबे या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर या सगळ्या प्रकरणामधील इतर आरोपींचा तपास आंबोली पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर एनसीबीच्या नावाखाली मुंबई प्रायव्हेट आर्मी वसुली तर काम करत नाहीये ना याचासुद्धा तपास करावा लागेल, असा मंत्री नवाब मलिक यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.


एकीकडे एनसीबीच्या कारवाया मुंबईसारख्या शहरात सुरू असताना दुसरीकडे तोतया एनसीबी अधिकारी बनून जर सेलिब्रिटीज व इतरांना फसवणे, खंडणी मागणे, धमकवण्याचे प्रकार या घटनेनंतर समोर आले आहेत. त्यामुळे एनसीबीच्या नावाखाली तोतया अधिकारी बनून खंडणी मागणारी आर्मी खरंच काम करतीये का? हे शोधून काढण्याचं आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर आहे. मात्र या भोजपुरी अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर या तोतया अधिकार्‍यांपासून आणि खोट्या कारवाईपासून सेलिब्रिटी सुद्धा सावध होतील.


महत्त्वाच्या बातम्या :