Devendra Fadnavis : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पडळकर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी चांगलेच आक्रमक झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या हत्येचा कट केला असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, गोपीचंद पडळकर यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला आहे. घटनास्थळाजवळ एक डंपर आणण्यात आला होता. तो डंपर पडळकर यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न होता. त्या डंपर मध्ये दगड आणि काठ्या होत्या. त्याशिवाय त्यामध्ये सोडा बॉटल होत्या असे फडणवीस यांनी स्टेशन डायरीचा हवाला देत म्हटले. ही सगळी घटना पोलीस स्टेशनसमोर झाली. त्याठिकाणी 200-300 लोकं होते. त्या ठिकाणी असलेले पोलीस घटनेचे चित्रीकरण होते, असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला. पडळकरांवर हल्ला करणाऱ्यांचा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांसोबत फोटो असल्याचाही दावा फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या घटनेत गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रम्हांनंद पडळकर यांच्यावरचं 307 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. पडळकर यांच्यावर भादंवि 307 नुसार गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्या अधिकाऱ्याची बदली करावी अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेत्याने केली. पडळकरांच्या हल्ल्यात थेट सरकारचा संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितीत केलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे अजित पवार यांनी म्हटले. मी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत बोललो आहे. काही आमदार सुरक्षा नाकारतात. त्यांनी सुरक्षा नाकारू नये असेही अजित पवार यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, सगळा महाराष्ट्र मला 30 वर्षे ओळखतात तर काहीजण मला म्हणतात की 4 दिवसांत अजित पवार यांच्या हातात सरकार दिलं तर ते चार दिवसांत विकून खातील. मी कुणाच्या अध्यात मध्यात नसतो. त्यांनी तारतम्य ठेऊन बोलायला वागायला पाहिजे, असेही अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले.
काय आहे प्रकरण ?
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून नोव्हेंबर महिन्यात आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्याच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांचा पाय मोडला होता. पडळकर यांच्या गाडीने आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला होता. आटपाडी पोलीस स्टेशन जवळील साठे चौकात ही घटना घडली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून हा वाद सुरू झाला होता आणि त्याचें पर्यवसन शिवीगाळपर्यंत गेले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ट्रक अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, कटात जयंत पाटलांसह एसपीही सहभागी; पडळकरांचा आरोप
- नितेश राणेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन विधानसभेत जोरदार गोंधळ, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
- विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; आत्तापर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha