Crime News : एका चोराने थेट पोलिसांनाच आपला हिसका दाखवला. विरारमधून एका पोलीस चौकीसमोरून पोलिसांची पेट्रोलिंग बाईक चोरली आणि या बाईकवरून एका युवकाची नवी बाईक चोरून पोबारा केला असल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आपली बाईक चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, युवकाने आपल्या बाईक चोरी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर या सर्व घटनेचं बिंग फुटलं आहे. सध्या या चोरीची जोरदार चर्चा सुरू असून चोराचा शोध सुरू आहे. 


शुक्रवारी, २४ डिसेंबर रोजी विरार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या विरार पश्चिमेकडील बीट क्रमांक १ या चौकीसमोर पोलिसांची एमएच ४८ सी ४१० ही पेट्रोलिंग बाईक उभी होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांने चक्क पोलीसाची ही बाईकच चोरली. त्यानंतर त्या चोराने ही पोलीसांची बाईक घेवून थेट वसईतील गास रोडवरील सनसीटी गार्डन गाठलं. तेथे अनिल यादव हा आपला मित्र अमित पटेल सोबत आपली टीवीएस कंपनीची रायडर १२५ या मॉडलची बाईक घेऊन गेला होता. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उद्यानात फिरण्यासाठी आणि फोटो आणि व्हिडिओ शूट करण्याचे काम त्याच्याकडून सुरू होते. मात्र, तेथे काळ्या रंगाचा जॅकेट, निळया रंगाचा टी शर्ट, खाकी रंगाची कार्गो पॅंट घालून एकजण आला होता. आपण पोलीस असल्याचे त्याने अनिलला सांगितलं. त्याच्या नवीन बाईकची स्तुती करुन,  एक टेस्ट राईड घेवून येतो असं सांगितले.  अमित यादवची बाईक घेवून तो सकाळी ९ च्या दरम्यान तेथून फरार झाला. ही बाईक घेऊन जाताना त्याने पोलीसांची बाईक तेथेच सोडली. बाइक चोरी झालेल्या अनिलने समजूतदारपणा दाखवत चोराशी सुरू असलेला संवाद आपल्या मोबाईलमध्ये त्याच्या नकळत चित्रीत केला. 


या बाईक चोरीची तक्रार नोंदवल्यानंतर माणिकपूर पोलिसांनी या घटनेची माहिती विरार पोलिसांना कळवली. माणिकपूर पोलिसांनी त्याच दिवशी विरार पोलीसांची बाईक त्यांच्या ताब्यात दिली.  त्याच दिवशी पोलिसांची बाईक मिळाल्याने, संबंधित पोलिसाने तक्रार दाखल केली नसल्याचे विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी मान्य केले. बाईक चोराचा शोध सुरू आहे.