मुंबई : मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर असलेली हुसैनीवाला बिल्डिंग ही सहामजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी आहेत. 21 जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून 60 ते 65 रहिवासी अडकल्याची भीती आहे.


मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला ही सुमारे सव्वाशे वर्ष जुनी इमारत होती. मूळ तीनमजली असलेल्या इमारतीवर तीन मजले नंतर बांधण्यात आले होते. गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान ही इमारत कोसळल्याची माहिती आहे.

इमारतीत 12 खोल्या आणि सहा गोदामं असल्याचं भाजपचे स्थानिक नगरसेवक अतुल शाह यांनी सांगितलं आहे. इमारतीत 9 कुटुंब राहत होती. मात्र शंभर जण इमारतीत वास्तव्याला असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 50 वर्षीय इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इमारत पडण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तळमजल्यावरील मिठाईच्या दुकानात आग लागल्याचं समजतं.

LIVE : मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट परिसरात 4 मजली इमारत कोसळली


अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु झालं आहे. एनडीआरएफचं 90 जणांचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे, मात्र या भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे एनडीआरएफचं साहित्य घटनास्थळी पोहचण्यात अडथळे येत होते.

हुसैनीवाला इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या तीन इमारतींना तडे गेले होते. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.



'सेस'प्राप्त इमारत

हुसैनीवाला इमारत ही उपकरप्राप्त (सेस) इमारत होती. म्हाडा'च्या अंतर्गत ही इमारत येत होती. 2013 साली इमारतीला नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर काही रहिवासी इथून निघून गेले, तर काही जण मात्र इथेच राहत होते.

'या भागातील अनेक इमारती खूप जुन्या म्हणजे कमीत कमी 50 वर्षांपूर्वीच्या आहेत. मुंबईत झालेल्या जोरदार
पावसाच्या तडाख्यानं आधीच जुन्या-जर्जर झा इमारतींना धोका निर्माण झाला आहे.

50 ते 100 वर्षांपूर्वीच्या ज्या इमारतींमध्ये मालकांनी पागडी सिस्टीमवर किंवा डिपॉझीट सिस्टीमवर भाडेकरु ठेवले, ते वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत. या इमारतींची दुरुस्ती करणं मालकांना परवडत नव्हतं. 1976 साली महाराष्ट्र शासनानं नवा कायदा केला आणि विशेष करांअंतर्गत या इमारती दुरुस्त कराव्यात असं म्हटलं. अशा इमारतींना सेस, म्हणजे उपकर लागू होतो.

ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये होती. सेस इमारतींची देखभाल करणं, दुरुस्ती करणं ही जबाबदारी म्हाडाची आहे.

कोसळलेली इमारत नेमकी कशी होती?

इमारतीचं नोंदणीकृत नाव – हुसैनी इमारत

मूळ इमारत 3 मजली, त्यावर 3 मजले नंतर बांधले

तळमजल्यावर - अनिवासी गाळा/ गोडाऊन

1. पहिल्या मजल्यावर 4 खोल्या

2. दुसऱ्या मजल्यावर 1 खोली

3. तिसऱ्या मजल्यावर 1 खोली

4. चौथ्या मजल्यावर 1 खोली

5. पाचव्या मजल्यावर 1 खोली

6. सहाव्या मजल्यावर 1 खोली



गेल्या महिन्याभरातील मुंबईत इमारत कोसळण्याची ही तिसरी दुर्घटना आहे. 26 जुलै 2017 रोजी घाटकोपरमध्ये साईदर्शन ही इमारत पडली होती. तर गेल्या आठवड्यात चांदिवलीत इमारत कोसळली होती.