मुंबई : गेल्या तीन वर्षातील कारवाया पाहता मुंबई शहर ड्रग्ज हब तर बनत नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. मुंबई ही अंमली पदार्थांची राजधानी तर बनत नाही चालली ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मागील तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत 208 गुन्हे दाखल केले असून यात 298 आरोपींना अटक केली आहे. मागील तीन वर्षात 131 कोटींचा 3414 किलो मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे. मागील तीन वर्षात यावर्षी कारवाईत सात पटीने वाढ झाली आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील तीन वर्षात अंमली पदार्थ आणि अन्य उत्तेजक पदार्थ अंतर्गत माहिती विचारली होती. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप काळे यांनी अनिल गलगली यांस प्रादेशिक विभागनिहाय माहिती उपलब्ध करुन दिली आहे. एकूण पाच युनिट्स कार्यरत असून यात दक्षिण प्रादेशिक विभाग- आझाद मैदान युनिट, मध्य प्रादेशिक विभाग- वरळी युनिट, पश्चिम प्रादेशिक विभाग- बांद्रा, पूर्व प्रादेशिक विभाग- घाटकोपर युनिट, उत्तर प्रादेशिक विभाग- कांदिवली युनिट अशी सरंचना आहे. अनिल गलगली यांस सन 2019, 2020 आणि 2021 पर्यंत एनडीपीएस अंतर्गत केलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. या विविध अंमली पदार्थात गांजा, चरस, एमडी, कोकेन, एमडीएमए, कोडेइन, ओपीम,  एलएसडी पेपर्स, अल्परझोअम, नेत्रावेत टॅब्लेट याचा समावेश आहे.


मुंबई ड्रग्ज हब : सर्वाधिक मुद्देमाल 2021 मध्ये जप्त
सन 2019 आणि सन 2020 च्या तुलनेत सन 2021 मध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष अधिक सक्रिय झाला असून 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत कारवाई सात पटीने वाढली आहे. सन 2019 मध्ये 394.35 किलो मुद्देमाल जप्त केला असून यात 1343 स्ट्रीप्स, 7577 बॉटल्स आणि 1551 डॉट मिली ग्राम आहे. याची एकूण किंमत 25.29 कोटी इतकी आहे. सन 2020 मध्ये 427.277, किलो मुद्देमाल जप्त केला असून यात 5191 बॉटल्स, 66000 टॅब 14 डॉट मिली ग्रॅम आहे. याची एकूण किंमत 22.24 कोटी इतकी आहे. तर 20 ऑक्टोबर 2021 च्या वर्षी 2592 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि 15830 बॉटल्स व 189 एलएसडी पेपर्स सुद्धा आहे ज्याची किंमत 83.19 कोटी इतकी आहे.


अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन 2019 आणि सन 2020 च्या तुलनेत सन 2021 मध्ये सर्वाधिक गुन्हे नोंद तर केलेच तसेच अटक आरोपी सुद्धा सर्वाधिक होते. 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 94 गुन्हे नोंद झाले ज्यात अटक आरोपींची संख्या 137 आहे. सन 2019 मध्ये 70 गुन्ह्यात 103 आरोपींना अटक करण्यात आली तर सन 2020 मध्ये फक्त 44 गुन्ह्याची नोंद झाली ज्यात आरोपी अटक संख्या 58 होती.


अनिल गलगली यांच्या मते या कारवाईत अजून भर पडू शकते यासाठी स्थानिक पातळीवर गुन्ह्यात वाढ झाली तर त्या पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. कारण अंमली पदार्थ विरोधी कक्षाला माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कारवाईत वेळ जातो आणि काही वेळा आरोपी फरार होतात. यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि धडक कारवाईची अपेक्षा आहे.


महत्वाच्या बातम्या :