मुंबई : नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांवर केलेल्या आरोपानंतर रिव्हर अँथम गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा यांचं नाव यूट्यूबवरुन आता हटवण्यात आलंय. रिव्हर अँथम गाण्यातील फायनान्स हेड जयदीप राणा हे ड्रग्ज पेडलर आहेत, जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. सध्या जयदीप राणा हे ड्रग्ज प्रकरणात गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एका राजकीय विश्लेषकानं ट्विट केलेल्या फोटोचा हवाला देत भाजपवर निशाणा साधला होता. एका राजकीय विश्लेषकानं अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट करून त्यांच्याबरोबर असलेली व्यक्ती ड्रग पेडलर असल्याचा दावा केला. या फोटोवर बोट ठेवत नवाब मलिक यांनी ड्रग पेडलरचं भाजप कनेक्शन काय असा सवाल केला होता. मलिकांच्या या आरोपानंतर आता जयदीप राणा यांचं नाव फायनान्स हेड म्हणून रिव्हर अँथम या गाण्यातून काढण्यात आलं आहे.
फडणवीस यांच्या आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचा काळा धंदा सुरु आहे असा थेट आरोप नवाब मलिकांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक आणि सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिकांनी जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा संबंध देवेंद्र फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता अमृता फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांनी केलेले आरोप खोडून काढत कुणी अंगावर आलं तर सोडणार नाही असा इशारा नवाब मलिकांना दिला. मर्द असाल तर तुम्ही फडणवीसांना टार्गेट करा, माझ्यावर कसले आरोप करता, माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
फडणवीसांचे प्रत्युत्तर
नवाब मलिकांच्या आरोपाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जर एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर फोटो काढल्यानंतर जर ड्रग्ज कनेक्शन जोडलं जात असेल, तर नवाब मलिक यांचे जावई ड्रग्जसकट सापडले. जर नवाब मलिक यांचा रेशिओ लावायचा असेल तर संपूर्ण एनसीपी पार्टी ड्रग्ज माफिया झाली पाहिजे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
महत्वाच्या बातम्या :