Atul Londhe on BJP : ड्रग्ज प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना काँग्रेसनं या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप केलाय. देशभरात भाजपच्या संरक्षणात ड्रग्जचा व्यापार सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. अदानींचा पोर्ट असलेल्या मुंद्रा पोर्टवर डीआरआयनं सर्वात मोठी कारवाई करूनही त्याचा तपास गृहविभागाच्या अखत्यारितील एनआयएला का देण्यात आला? असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. याशिवाय समीर वानखेडेंना अटक करावी अशी मागणीही काँग्रेसनं केलीय. 


अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही भाजपवर ड्रग्स संदर्भात गंभीर आरोप केले आहे. मुंबईतील कथित क्रूझ पार्टी असो किंवा मुंद्रा पोर्टवर पकडलेला ड्रग्सचा साठा. दोन्ही ठिकाणी भाजप नेत्यांशी जवळीक असलेल्या मनीष भानुशाली, किरण गोसावी, रवींद्र कदम यांचे नाव आणि त्यांची उपस्थिती दिसून येणं संशयास्पद असल्याचं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. 


पाहा व्हिडीओ : समीर वानखेडे यांनाअटक करा, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी



मुंद्रा पोर्टवर जरी 3 हजार किलो ड्रग्स पकडल्याचं सांगितलं गेलं असलं तरी त्यापूर्वी 25 हजार किलो ड्रग्स तिथून देशात विविध ठिकाणी पाठवल्याचा गंभीर आरोपही अतुल लोंढे यांनी बोलताना केला आहे. एवढंच नाही तर मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो ड्रग्स पकडून जगातील सर्वात मोठी कारवाई करणाऱ्या डीआरआयकडून तो तपास काढून केंद्रीय गृह विभागाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एनआयएकडे का सोपवला? असा प्रश्नही काँग्रेसनं विचारला आहे. काल नवाब मलिक यांनी जे आरोप केले, ते विचारपूर्वक आणि पुरावे पाहूनच केले असावेत. तसेच भाजपच्या ड्रग्स कनेक्शनबद्दल काल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत थेट उत्तर न देता अंडरवर्ल्डचा विषय काढला याची आठवणही अतुल लोंढे यांनी करून दिली. मुंद्रा पोर्टवर ज्या दिवशी ड्रग्स सापडले, त्याच दिवशी किरण गोसावी मुंद्रामध्ये होता. किरीट सिंह राणा नावाचे भाजपचे गुजरात सरकारमधील एक मंत्रीही त्याच दिवशी मुंद्रामध्ये होते. तर MH IG 3000 या क्रमांकाची एक इनोव्हाही मुंद्रामध्ये होती. रवींद्र कदम नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणी असलेली ही इनोव्हा खोट्या पत्त्यावर नोंदवलेली असून हे सर्व संशयास्पद आहे. पंजाबमध्ये ड्रग्समुळे झालेला तरुणाईचं नुकसान देशभर होण्याची शक्यता असल्यानं काँग्रेस पक्ष हा मुद्दा उचलत असल्याचंही अतुल लोंढे यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. 


बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीनंतर कशाला वाट पाहाता? : नवाब मलिक 


बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीनंतर कशाला वाट पाहाता? माझं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कुणीचं सिद्ध करु शकत नाही, असं आव्हान नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर तुम्ही राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतात, तेव्हा काय केलं? कारवाई का केली नाही? असाही सवाल मलिकांनी उपस्थित केला. नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आरोपाचा धमाका केलाय.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या मोठ्या आरोपाची आठवणही मलिकांनी यावेळी करुन दिली. पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमच्या कार्यकाळात झालेली पार्टी दिसली नाही का? या पार्टीतील एका टेबलची किंमत 15 लाख रुपये होती. या पार्टीत नक्कीच ड्रग्ज वापरले गेले असतील. ही पार्टी तुम्हाला नाही का दिसली? असा सवाल मलिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावेळी नवाब मलिक यांनी जावयाचा बचाव केला. शिवाय समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :