उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेल्या मुंबईतील दाम्पत्याचा बर्फात अडकून मृत्यू
मुंबईतील एक दाम्पत्य उत्तराखंडमध्ये बर्फाच्छित भागात मृतावस्थेत आढळले आहेत.
Death in Snowfall : उत्तराखंड येथे बर्फाळ भागात फिरायला गेलेल्या एक दाम्पत्याचा प्रचंड थंडी आणि बर्फात अडकून मृत्यू झाला आहे. तब्बल पंधरा दिवसांनी स्थानिक पोलिसांना त्यांचा शोध लागला. संजीव गुप्ता आणि आणि त्यांची पत्नी सिंशा गुप्ता असे दुर्देवी मृत दाम्पत्याचे नाव आहे.
मुंबईचे रहिवासी असलेले हे दाम्पत्य १३ डिसेंबर रोजी उत्तराखंड येथील जोशीमठ परिसरात असलेल्या गौरसो टॉप परिसरात फिरायला गेले होते. या भागात प्रचंड बर्फवृष्टी झाली होती. या बर्फवृष्टीत हे दाम्पत्य अडकून पडले असावेत आणि त्यातच प्रचंड थंडीने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहेत. संजीव गुप्ता हे 'झी न्यूज नेटवर्क'मध्ये वरिष्ठ कॅमेरामन म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. लोअर परेल येथील भारत मिल म्हाडा वसाहतीमध्ये भाड्याने राहत होते.
ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार यांचा शोध लागत नव्हता. गुप्ता सदस्य असलेल्या टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. घटनेच्या जवळपास दोन आठवड्यानंतर गुप्ता दाम्पत्याचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. ही घटना दुर्देवी आणि धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी व्यक्त केली आहे. मुंबई प्रेस क्लबनेदेखील शोक व्यक्त केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ओमायक्रॉनची लाट म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड; शास्त्रज्ञांचा दावा
- Fact Check : अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने RTPCR टेस्ट केली बंद? जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागचं सत्य
- OTP नाही, लिंकवर क्लिक नाही तरी बँक खात्यावर हॅकर्सचा दरोडा; पोलिसही चक्रावले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha