मुंबई : एकीकडे मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावं आणि नववर्षाचं सेलिब्रेशन गर्दी करुन करु नये असं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचा विसर त्यांच्याच पक्षाला पडला असून अंधेरीमधील शिवसेनेच्या मालवणी जत्रोत्सवाला तुफान गर्दी झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना अशा गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी कशी मिळते, कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का असे सवाल विचारले जात आहेत. 


मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत डी एन नगर पोलीस स्टेशन समोर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मैदानामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून 'मालवणी जत्रोत्सव'चे आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे. या गर्दीमध्ये लोकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली करताना पाहायला मिळत आहे. 


राज्यात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनला बंदी घालण्यात आली आहे तर मग शिवसेनेच्या जत्रोत्सवाला परवानगी कशी काय दिली असा सवाल विचारला जात आहे. तसेच हा जत्रोत्सव हा अंधेरी पोलीस स्टेशन समोरच आयोजित करण्यात आला आहे. मॉलसारख्या ठिकाणी महापौरांकडून पाहणी दौरा आयोजित केला जात आहे. मग या ठिकाणी महापौर का येत नाहीत असाही प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. 


दरम्यान, मुंबईत आज 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, 451 जणांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 158 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 22 हजार 334 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 251 दिवसांवर पोहचलाय.


महत्त्वाच्या बातम्या :