MMRDA House : बनावट सही-शिक्क्याद्वारे MMRDA ची घरे विकणाऱ्या आरोपीला मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बनावट सही शिक्के वापरून एमएमआरडीएची घरे लोकांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी धडक कारवाई करीत पोलिसांनी आरोपी इमरान मेहबुब जुनेजा उर्फ मुन्ना मर्चट (३९ ) याला अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट शासकीय शिक्के, चाव्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपीच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात नेले असता ७ जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आधी देखील एमएमआरडीएची बंद घरे बनावट अलॉटमेंट लेटर आणि एग्रीमेंट बनवून दलालामार्फत विकली जात होती. या गोरख धंद्याचा पर्दाफाश ठाणे पालिका स्थावर मालमत्ता सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी करून डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आरोपींना गजाआड केले होते. 


मुंब्रा पोलिसांनी अटक केलेला आरोपी इमरान मेहबुब जुनेजा उर्फ मुन्ना मर्चट (३९) हा गुजरात इथे राहणारा आहे. तो एमएमआरडीएची बंद असलेली घरे बनावट सही शिक्का वापरून, अलॉटमेंट लेटर बनवून लोकांना विकत असल्याची गुप्त माहिती मुंब्रा पोलीस स्टेशन मधील सह पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे यांना मिळाली होती. मुंब्रा येथील एमएमआरडीए च्या घरांचा यात प्रामुख्याने समावेश होता. त्यामुळे पोलीस पथकाने धाड टाकून आरोपीला 31 डिसेंबरला मुंब्रा येथील घरातून अटक केली. आरोपीच्या मुंब्रा येथील राहत्या घरातून २१ शासकीय स्टॅम्प, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सदनिका वाटप आदेश असे लिहीलेले एकूण ९९ बुकलेट, १४ घराच्या चाव्या, १८ गिन्हाईकांचे सदनिकांचे कागदपत्रे, २४ एमएमआरडीए चे लहान स्टीकरचे शीट, ५ स्टॅम्पपेंड, एक डायरी, एक प्रिंटर, तुळजाभवानी को ऑप. सोसायटी लेटरहेड वरील ९ कागदपत्रे, एमएमआरडीए चे अॅलोटेड फ्लॅटचे लॅमिनेशन केलेले सर्टीफिकेट, १८ टोरंट पॉवरचे इंजिनियर नाव असलेले पिंक कलरचे फॉर्म आणि इतर कागदपत्रे असा एकूण १० हजार पेक्षा जास्त किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. मी ग्राहकांना आकर्षित करुन त्यांचेकडून पैसे घेवून शासकीय योजनेतील सदनिका वाटप करण्याचा बनावट आदेश देत होतो अशी कबुलीच अटक आरोपी मुन्ना मर्चंट यांनी मुंब्रा पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले.