अमिताभ बच्चन यांचे माजी अंगरक्षक जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित, विभागीय चौकशी करण्याचे आदेश
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे माजी अंगरक्षक जितेंद्र शिंदे (Bodyguard Jitendra Shinde) विनापरवानगी दुबई आणि सिंगापूरला गेल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : अमिताभ बच्चन यांचे माजी अंगरक्षक जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. जितेंद्र शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आली आहे. विनापरवानगी दुबई आणि सिंगापूरला गेल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. पत्नीच्या नावे सुरक्षा कंपनी स्थापन केल्याचा जितेंद्र शिंदे यांच्यावर आरोप आहे.
जितेंद्र शिंदे मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबल असून ते 2015 पासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून नियुक्त होते. अमिताभ बच्चन यांना X category या दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे दोन कॉन्स्टेबल कायम त्यांच्यासोबत असतात. जितेंद्र शिंदे हे रितसर अर्ज करुन किंवा आपल्या वरिष्ठांना न देता चार ते पाच वेळा दुबई आणि सिंगापुरला गेले आहेत. तसेच त्यांनी सुट्टीवर बाहेर जाताना खोटी माहिती दिली आहे. या चौकशीमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे
रिपोर्टनुसार जितेंद्र शिंदे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, ते स्वत: सिक्युरिटी एजन्सीमार्फत सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. ही सिक्युरटी एजन्सी शिंदे त्यांच्या पत्नीच्या नावाने चालवतात. जितेंद्र शिंदे यांनी हे देखील सांगितले की, अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांना कोणतेही मानधन मिळत नाही. जितेंद्र शिंदे यांचा वर्षाची कमाई किती होते आणि त्यांनी खरचं पोलिस अधिकाऱ्यांना या विषयी माहिती दिली होती का? या सर्व गोष्टींचा पोलिस तपास करत आहे. चर्चेत आल्यानंतर जितेंद्र शिंदे यांची दक्षिण मुंबई पोलिस स्टेशनल बदली करण्यात आली आहे.
जितेंद्र शिंदे यांचा पगार हा एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओपेक्षाही अधिक आहे. त्यांच्या वेतनाचा आकडा थक्क करणारा आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात. म्हणजे ते महिन्याला जवळपास 12 लाख रुपये इतका पगार घेत असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना सुरक्षा पुरवत आहेत. जितेंद्र शिंदे यांची सिक्युरीटी एजन्सी देखील आहे, अशी माहिती समोर आली होती. अमेरिकेचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड भारतात आला होता त्यावेळी देखील शिंदे यांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. अर्थात बिंग बी बच्चन यांच्या सांगण्यावरूनच शिंदे यांनी एलिजा वुडला सुरक्षा दिल्याची माहिती आहे.