Mumbai News : मुंबईतील (Mumbai) घाटकोपर धक्कादायक घटना घडली. एका ओला चालकाने (Ola Driver) आठ जणांना उडवलं. घाटकोपरच्या (Ghatkopar) सुधा पार्क परिसरात हा भीषण अपघात घडला. ओला चालकाने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक दिली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


अपघात नेमका कसा घडला?
घाटकोपरमध्ये दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. हा ओला चालक हा घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये राहतो, अशी माहिती मिळाली आहे. राजू यादव असं या ओला चालकाचं नाव आहे. आज दुपारी सुधा पार्क परिसरात गाडी चालवत असताना अचानकपणे गाडीने वेग घेतला. यावेळी रस्त्यावर जी जी वाहनं होती त्यांना उडवत तो हायवेच्या दिशेने गेला. धडक दिली त्यावेळी रस्त्यावर विद्यार्थी देखील होते. यावेळी ओला चालकाने रिक्षा, टेम्पो आणि दुचाकींना धडक दिली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत, ज्यात तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 


पोलिसांनी अपघातानंतर तातडीने ओला चालक राजू यादवला ताब्यात घेतलं आहे. राजावाडी रुग्णालयात आतापर्यंत आठ जणांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर झोन पाचचे उपायुक्त प्रशांत कदम हे स्वत: जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. 


जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता
नेमकी काय घटना घडली हे अद्याप समजू शकलेलं नाही. चालकाचं नियंत्रण सुटलं की गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला अथवा तो नशेच्या अंमलात होता की आणखी काही वेगळं कारण आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरु केली आहे. रुग्णालयात आणखी काही जण दाखल होत आहेत. त्यामुळे अपघातातील जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु या संपूर्ण घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या