नवी मुंबई : ओला कारच्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेण्याऐवजी चालकाने रस्त्यालगत फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचाराविना मृत्यू झाला.


खारघरमध्ये ओला टॅक्सीच्या धडकेत सचिन सुर्वे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर ओला ड्रायव्हरनं सचिनला सीबीडीच्या एमजीएम रुग्णालयात नेलं. पण सचिन गंभीर जखमी असल्यानं त्याला वाशीमधील रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला.

त्यानंतर ओला ड्रायव्हरनं सचिनला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या बाहण्यानं नेरुळच्या अज्ञातस्थळी सोडून दिलं. त्यातच 32 वर्षीय सचिन सुर्वेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गाडीचा मालक रईस खानला अटक केली आहे. मात्र आपण नाही तर ड्रायव्हर गाडी चालवत होता असा दावा रईश खाननं केला आहे.

माझ्या पतीचा जीव घेणाऱ्या ओला कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी सचिन सुर्वे यांच्या पत्नी रुपाली सुर्वे यांनी केली आहे. रात्री 11 नंतर गायब झालेल्या रईस खानला शेधण्यासाठी रुपाली सुर्वे धडपडत होत्या.

सचिन यांना घेऊन गायब झालेल्या ओला गाडीचे लोकेशन मिळवण्याचा प्रयत्न रुपाली यांनी केला. मात्र त्यांना ओला कंपनीने दाद दिली नाही. त्यांनी सीबीडी पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांना विनंती केली. सीबीडी पोलिसांनी स्टेशनमधून ओला कंपनीला संबंधित गाडीचे लोकेशन देण्याची मागणी केली, तेव्हा पोलिसांनाही कंपनीने उडवून लावले.

रात्रभर एक पत्नी आपल्या पतीच्या जीवाची भीक ओला कंपनीकडे मागत होती. मात्र नियमानुसार लोकेशन देऊ शकत नसल्याचं सांगत सकाळपर्यंत ताटकळत ठेवण्यात आलं. अखेर सकाळी मिळाला तो सचिन सुर्वे यांचा मृतदेह.

ओला कंपनीने सचिन यांना घेऊन गायब झालेल्या गाडीचं लोकेशन रुपाली किंवा पोलिसांना दिलं असतं, तर जखमी अवस्थेत रस्त्यात टाकून गेलेल्या सचिन सुर्वे यांचा जीव वाचवता आला असता. त्यामुळे आपल्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओला कंपनीवर कारवाई करण्याची मागणी रुपाली सुर्वे यांनी केली आहे. त्या स्वतः ओला कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

त्याचबरोबर सचिन सुर्वे यांना जखमी अवस्थेत पहिल्यांदा सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र डॉक्टरांनी दाखल करुन न घेता कामोठे हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं. गंभीर जखमी असूनही सीबीडी एमजीएम रुग्णालयाने आपल्या पतीवर उपचार न केल्याने रुग्णालयाविरोधातही रुपाली सुर्वे तक्रार दाखल करणार आहेत.