मुंबई: वांद्रे-अंधेरी सी लिंकचं काम हे मुंबईत सुरू आहे, पण या कामासंबंधी मुलाखती मात्र चेन्नईमध्ये घेतल्या जात आहेत, त्यामुळे भूमीपुत्रांचं काय असा सवाल शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांवर लक्ष द्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या संमतीने महाराष्ट्राचं आर्थिक खच्चीकरण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "आज मी कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने आज रोजगार आणि विकासाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. वांद्रे- अंधेरी सी लिंकचा प्रकल्प हा मुंबईमध्ये होणार आहे.पण त्यासाठी येत्या रविवारी चेन्नईमध्ये मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांच्या हक्काचं काय असा प्रश्न निर्माण होतोय. मला चेन्नई किंवा गुजरातवर आक्षेप नाही, पण काम जर मुंबईत असेल तर मग केवळ चेन्नईमध्ये मुलाखती का? त्याचसोबत मुंबई, ठाणे, संभाजीनगर या सारख्या शहरातही मुलाखती व्हाव्यात."
आदित्य ठाकरे म्हणाले की, "वांद्रे- अंधेरी सी लिंकच्या कामासंबंधित मुलाखतीची ही जाहिरात ऑनलाइन आली आहे. मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं अशी अपेक्षा आहे. उद्योग मंत्र्यांना त्यांच्या खात्यात काय सुरू आहे याबद्दल काहीच माहीत नसतं. मुख्यमंत्री यांची या सगळ्यावर भूमिका महत्त्वाची आहे. यातून दोन गोष्टी समोर येतायंत. मुख्यमंत्री यांच्या समंतीने हे सर्वकाही सुरू आहे. नाहीतर त्यांना या गोष्टी माहीतच नाही. पक्षप्रवेश केले जातायत, मग उद्योगांचे प्रवेश राज्यात कधी होणार? एमएसआरडीसीच्या खात्यात मुंबई , महाराष्ट्रत संधी का नाही?"
आदित्य ठाकरे म्हणाले की, "एमटीएचएलची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. आमच्या वेळेस 80 टक्के काम पूर्ण झालं होतं. आता ते म्हणताय 63 टक्के काम पूर्ण झालं आहे. वर्सोवा वांद्रे सी लिंकचे काम मध्ये बंद पडलं होतं. तिथे चारटोल लादले जाणार आहेत. कंपनीने कॉन्ट्रॅक्टर बदलले आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीच माहिती नाही."
रामदास कदम यांच्यावर बोलायचं नाही
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, "रामदास कदम यांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही. त्यांचा सगळा फोकस आम्हाला बदनाम करण्यासाठी आहे. आम्हाला यावर राजकारण करायचं आहे. त्यांनी किती पातळी सोडलीय हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे."