मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर आपला ध्वज बदलला आहे. मुंबईत गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसंच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत.

मनसेच्या जुन्या झेंड्यामध्ये चार रंग होते. या झेंड्याच्या मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूला हिरवा रंग आहे. पण मनसे आता राजकारणात कुस बदलणार हे स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे यावेळी मनसेच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही प्रतिमा आहे. त्यामुळे मनसे प्रखर हिंदुत्वादाकडे वाटचाल करणार हे स्पष्ट आहे.

ध्वजाचं अनावरण करताना राज ठाकरे म्हणाले की, "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. माझं भाषण संध्याकाळी होणार आहे. मनसेचं पहिलं अधिवेशन आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. सगळ्यांचं मन:पूर्वक स्वागत करतो. गेले काही दिवस ज्या गोष्टीची चर्चा सुरु होती, तो पक्षाचा नवा ध्वज मी आपल्यासमोर सादर करतो, धन्यवाद."

राज ठाकरे यांच्या हस्ते नव्या ध्वजाचं अनावरण होताच कार्यक्रमस्थळी ढोल-ताशांच्या गजरात एकच जल्लोष झाला. यानंतर व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

मनसे हा पक्ष स्थापन होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. परंतु या 14 वर्षांमध्ये मनसेच्या वाट्याला यशापेक्षा अपयशाचे झेंडेच हाती घ्यावे लागले आहेत. 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 आमदार निवडून आणले. नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई महापालिकांमध्येही मनसेला मोठं यश मिळालं. नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. परंतु त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांचे दारुण पराभव झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मनसेची आणखीच अधोगती झाली. विधानसभेत एकच आमदार निवडून आला. विविध महापालिका निवडणुकीतही फारसं यश मिळालं नाही.

सततच्या अपयशामुळे मनसेच्या विचारधारेमध्ये फोकस नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये पक्षाची सर्वसमावेशकता दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ही आघाडीच्या वळचणीला गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या

मनसेचा प्रस्तावित नवा झेंडा, भगव्या रंगातून बदलत्या राजकारणाची दिशा

मनसेच्या राजकारणाची दिशा बदलणार, पक्षाचा झेंडा भगव्या रंगात रंगणार?