मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आहे. यानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर येणार आहेत. याशिवाय राज्यभरातून शिवसैनिक आणि पदाधिकारी येणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील मंत्रीही हजेरी लावणार आहेत. तर दुसरीकडे बिकेसी इथे शिवसेना जल्लोष सोहळा आयोजित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार सोहळा शिवसैनिकांकडून करण्यात येणार आहे.


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकासआघाडीकरत सत्तास्थापन केली आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राला शिवसनेता मुख्यमंत्री मिळाला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशातच आज शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 94व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांकडून वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर भव्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बाळासाहेबांना आदरांजली वाहणारं ट्वीट 





बाळासाहेबांच्या 94व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, महान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. धैर्यवान आणि दुर्दम्य साहस असलेल्या बाळासाहेबांनी लोकांच्या कल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांना नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत.


माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली





माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन ट्वीट केले आहेत. आपल्या एका ट्वीटमधून बाळासाहेबांना आदरांजली वाहणारा व्हिडीओ त्यांनी ट्वीट केला आहे तर दुसऱ्या ट्वीटमध्ये 'महाराष्ट्राचं वैभव, ज्वलंत विचारांचा ‘मार्मिक’ ठेवा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!' असं कॅप्शन देत एक फोटो शेअर केला आहे.





दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन शिवसैनिकांकडून करण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या : 


बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर


भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौऱ्यावर, सरकारच्या 100 दिवसपूर्तीला श्रीरामाचं दर्शन घेणार


पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरू करूयात; आदित्य ठाकरेंची पुणेकरांना कोपरखळी