मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुंबई बँकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. मात्र, आता त्यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. मजूर संस्थेतून निवडणूक लढवल्याप्रकरणी सहकार विभागाने अपात्र ठरविल्यानंतर राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दरेकरांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रतिष्ठेची ठरलेली मुंबई सहकारी बॅंकेची निवडणूक पार पडली. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पॅनलला यात घवघवीत यश मिळाले. निवडणुकीचा गुलालही त्यांच्या अंगावर पडला. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मजूर संस्थेतून उमेदवारी घेऊन जिंकणाऱ्या प्रविण दरेकर यांची मजूर प्रवर्गातून उमेदवारी सहकार विभागाने अपात्र ठरवली आहे. याच्या आधीच प्रविण दरेकर यांनी या प्रवर्गातून राजीनामाही दिला आहे. मात्र, प्रविण दरेकरांनी दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
जी व्यक्ती अंगमेहनत करून मजूरी करते त्या व्यक्तीला मजूर संस्थेचे सद्स्य राहता येते. त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन हे मजूरी असली पाहीजे. मात्र, प्रविण दरेकर राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्याबदल्यात त्यांना जवळपास अडीच लाख रुपयांचे महिन्याला मानधन मिळते. त्यांची मालमत्ता करोडो रुपयांची असल्याची माहिती त्यांनीच निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मग ते मजूर कसे असा प्रश्न उपस्थित होतोय.
प्रविण दरेकरांना सहकार विभागाने अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी अपात्रतेची कारवाई झालेली नाही. मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे काही जण माध्यमांना हाताशी धरत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. व्यक्तीगत द्वेषातून ही कारवाई सुरू असल्याचे दरेकर म्हणाले. मी दोन ठिकाणी निवडून आलो आहे. मी निकाल घोषीत झाल्यानंतर मजूर विभातून निवडून आलो त्याचा राजीनामा दिला असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :