मुंबई महापालिकेला राणेंच्या घराचं मोजमाप करणं हे एकच काम; नारायण राणेंचा हल्लाबोल
Minister Narayan Rane on Shiv Sena BMC : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Minister Narayan Rane on Shiv Sena BMC : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या जुहू येथील बंगल्याबाबत होत असलेल्या वारंवार तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले की, मुंबई महापालिकेला राणेंच्या घराचं मोजमाप करणं हे एकच काम आहे. राणेंनी म्हटलं की, काल मला सांगितलं की मला नोटीस आली. त्यामुळं वास्तव सांगण्याची गरज वाटली म्हणून मी बोलत आहेत. 13 वर्षापूर्वी या घरात आलो. 17 सप्टेंबर 2009 साली मी इथं आलो, त्यावेळी महापालिकेने OC दिली. कायदेशीर काम केलं आहे त्यानंतर एक इंचही काम केलं नाही. या घरात आम्ही 8 जण राहतो. यात आम्ही हॉटेल चालवत नाहीत. मातोश्री कडून काही लोकांना तक्रार करायला लावली जाते, असं राणे म्हणाले.
सध्याचे पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत
बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेना काढली. सध्याचे पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मातोश्री पार्ट 2 बेकायदेशीर आहे. पैसे भरुन बांधकामाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. माझ्याकडे त्यांच्या दोन्ही घरांचे प्लॅन असल्याचे राणे म्हणाले. पण मी कोणाच्या घरावर बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब असते तर गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला आले असते. सध्या राज्यात सुडबुद्धीचे लोक सत्तेत असल्याचे राणे म्हणाले.
आम्ही कोणाच्या पोटावर मारले नाही
मी शरण येणाऱ्यापैकी नाही, मी मराठा आहे. आमचे दैवत इथे आहे. आम्हाला कोणी राजकारण शिकवू नये. आम्ही कोणाच्या पोटावर मारले नाही मारणार नाही. तसेच कोणाच्या घराबद्दल तक्रार केली नसल्याचे देखील राणेंनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: काही बोलत नाहीत. मात्र, त्यांचे खासदार बोलत आहेत. सध्या विकासाची कोणतेही कामे ते करत नसल्याचे राणे यावेळी म्हणाले. दरम्यान, 8 माणसांसाठी एवढी मोठी इमारत असाताना आणखी इमारत का वाढवू? असेही राणे यावेळी म्हणाले. सव्वा दोन वर्षात शिवसैनिकांना काय मिळाले, त्यापेक्षा मातोश्री आणि चमच्यांना काय मिळाले? असा सवालही राणे यांनी यावेळी केला.
दुसरा कोणी असता तर राजीनामा दिला असता
अलिबागमधील 19 बंगल्याच्या मुद्यावर देखील राणेंनी यावेळी प्रतिक्रिया दिली. त्याठिकाणच्या जागेवर सध्या बांधकाम नाही, मात्र, डॉक्युमेंटवर जागा आहे. मराठी माणसाला मुंबईत घर घेता येत नाही, आणि हे 19 बंगले बांधतात असेही राणे यावेळी म्हणाले. मी कोणाच्या आजारपणावर काही बोलणार नाही. दुसरा कोणी असता तर पदावर राहिला नसता, त्याने राजीनामा दिला असता असे राणे यावेळी म्हणाले. सध्या महाराष्ट्रात सुडाचे राजकारण सुरू आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर यांनी धंदा केला आहे. दृष्ट बुद्धी थांबवा असे म्हणत राणेंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा लगावला. मुख्यमंत्री मंत्रालयात, सभगृहात जात नाहीत. बैठकीला जात नाहीत. बाळासाहेंबाची पुण्याई म्हणून एवढे दिवस काढले असेही राणे म्हणाले.
अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता...
अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. दिशा सालियनचा 8 जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली. सांगितले आत्महत्या केली. मात्र, तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्य सरकारसह शिवसेनेवर जोरदर टीका केली.
सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणे यावेळी म्हणाले.