मुंबई : मुस्लिम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही रॅली रात्री उशिरानं मुंबईत दाखल झाली. मुंबईतील मुलूंड येथे ही रॅली पोहोचली त्यावेळी इथं मोठी गर्दी झालेली पाहायला मिळालं. या गर्दीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 


तिरंगा रॅलीच्या गर्दीचे व्हिडीओ समोर


एमआयएमची तिरंगा रॅली रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली आहे. इम्तियाज जलील यांनी काढलेल्या या रॅलीत मोठ्या प्रमाणावर मुस्लीम समाजाचे नागरिक सहभागी झाली होते. मुंबईत एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण हे देखील सहभागी झाले होते. वारिस पठाण यांनी रॅलीचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.


छत्रपती संभाजीनगर येथून सुरू झालेल्या या रॅलीचा प्रमुख उद्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधान पत्र देणे आणि दोषींवर त्वरीत कारवाईची मागणी करणे आहे. मुस्लिम धर्मविरोधी वक्तव्यांवर आधारित 58 गुन्हे दाखल असतानाही, अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.


छत्रपती संभाजीनगर समृद्धी मार्गे ही रॅली मुंबईच्या दिशेन रवाना झाली. मुंबई नाशिक महामार्गावरुन ही रॅली रात्री उशिरा मुंबईत दाखल झाली.  तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचा समावेश होता. यामुळं रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. 


इम्तियाज जलील यांची भूमिका


जातीच्या धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये भांडण लावणं सुरु आहे. दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. रामगिरी महाराजांच्या केसाला हात लावू देणार नाही,असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. काहीही बोलायचं असलं तरी बोला,तुमचं संरक्षण करु अशी भूमिका घेणं चुकीचं आहे. 


महाराष्ट्राला इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, फुले, शाहू आंबेडकरांचा इतिहास आहे. मात्र, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई होत नाही. भाजपचा पिल्लू नेता मुस्लीम समाजाच्या लोकांना मशिदीत घुसून मारेन, असं म्हणतो त्यावेळी त्याला अटक करायला पाहिजे होती, असं इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते या प्रश्नी भूमिका घेत नसल्याचं पाहायला मिळतं, असंही जलील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नसती तर इथं यावं लागलं नसतं, इम्तियाज जलील म्हणाले. 






इतर बातम्या :


नितेशला न्याय वेगळा असे का? इम्तियाज जलील यांचा सवाल, मुस्लिमविरोधी वक्तव्यावर जलील यांची चलो मुंबई तिरंगा रॅली