मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत राहिलेला मेट्रो 4 च्या कारशेडचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. मेट्रो 4 च्या कारशेडच्या जागेवरून आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या सर्व मागण्या एमएमआरडीए आणि जिल्हाधिकारी यांनी मान्य केल्या आहते. त्यामुळे या जागेवर आता सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मेट्रो 4 च्या कारशेडचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे.


एमएमआरडीएने घोडबंदर रोडवरील मोघरपाडा येथे मेट्रो-4 च्या कारशेडसाठी शंभर एकर जागेवर आरक्षण टाकले होते. परंतु, अनेक वेळा एमएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी या जागेवर जाऊन सुध्दा स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम होऊ शकले नव्हते. एमएमआरडीएने मेट्रोच्या कारशेडसाठी टाकलेल्या आरक्षणामुळे येथील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी हा प्रश्न निकालात काढण्यासाठी सरनाईक यांनी काही मागण्या केल्या. 


"कारशेड आणि महानगरपालिकेला उद्यानासाठी जमीन दिल्यानंतर उर्वरीत जागेवर कुठल्याही प्रकारचे आरक्षण न टाकता ती जमीन सर्व शेतकऱ्यांना विभागून द्यावी. जी जमीन शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, त्यामध्ये भविष्यात कुठल्याही प्रकारचे आरक्षण न राहता पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खारफुटीच्या जागे व्यतिरिक्त फ्री होल्ड जमीन रेसिडेन्सीयल झोनमध्ये शेतकऱ्यांच्या नावे करून द्यावी. तसेच कारशेड विकसीत करत असताना स्थानिक भुमिपुत्रांना या ठिकाणी रोजगार देणे एमएमआरडीएला बंधनकारक करावे, अशा मागण्या आमदार सरनाईत यांनी केल्या. त्यांच्या या सर्व मागण्या एमएमआरडीए आणि जिल्हाधिकारी यांनी मान्य केल्यामुळे मेट्रो 4 च्या कारशेडचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.


काय होता तिढा? 
घोडबंदर रोड येथील मोगरपाडा इथे एमएमआरडीएने मेट्रो कारशेडचे आरक्षण टाकलेले आहे. ती जमीन 1960 पासून तत्कालीन सरकारने 167 शेतकऱ्यांना प्रत्येकी 64 गुंठे यानुसार वितरीत केली होती. त्यानुसार त्या जमिनीवर गेल्या 60 वर्षांपासून स्थानिक भुमिपूत्र भात शेती आणि इतर व्यवसाय करत आहेत. मेट्रो कार शेडच्या आरक्षणामुळे या सर्वांचे व्यवसाय आणि उत्पन्न धोक्यात आले होते. अनेक वेळा एमएमआरडीएचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी या जागेवर गेले. परंतु, स्थानिकांनी त्यांना विरोध केल्यामुळे कारशेडचे काम रखडले होते.


दरम्यान, या प्रकल्पावरून भाजप नेते आशिष  शेलार यांनी टीका केली आहे. "मुंबईचे पालकमंत्री अजूनही वास्तव परिस्थिती मान्य करायला तयार नाहीत. ठाकरे सरकारकडून घाईघाईने मेट्रो 4 चा कारशेड प्रकल्प कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय चुकीचा आहे. कांजुरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी योग्य नाही. एकाच्या अहंकारामुळे मुंबईकरांचे दहा हजार कोटी रूपये आणि 3 वर्षांचा उशीर सहन करावा लागत आहे, असे ट्विट भाजप नेते आशिष शेलार यांची  केले आहे. 


महत्वाच्या बातम्या