Mumbai Local Mega Block : जर तुम्ही मुंबई लोकलनं प्रवास करत असाल आणि त्यातल्या त्यात मध्य रेल्वेवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची. 4 ते 6 फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे. पाचवी, सहावी मार्गिकी 6 फेब्रुवारीपासून खुली होणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे. पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यानंतर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होणार आहे. 


ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांना अंतिम स्वरूप दिलं जात आहे. या मार्गिकेच्या विविध कामांसाठी डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत मोठमोठे मेगाब्लॉक घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार डिसेंबर 2021 मध्ये 18 तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. तर जानेवारी 2022 मध्ये 24 तासांचा आणि 36 तासांचाही मेगाब्लॉक घेण्यात आला होता. 23 जानेवारीला 14 तासांचा मेगाब्लॉक असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मध्यरात्री 1.20 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 3.20 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यावेळी साधारण 300 हून अधिक लोकल फेऱ्या रद्द असतील. या ब्लॉकनंतर सर्वात मोठा ब्लॉक 72 तासांचा असणार आहे. हा ब्लॉक 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा घेण्यात येणार आहे. त्यावेळी लोकल फेऱ्या रद्द करतानाच मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होईल.


पाहा व्हिडीओ : 4 ते 6 फेब्रुवारी 72 तासांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या काय आहे कारण



पाचव्या-सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर फायदा काय? 


पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वे वेळापत्रकामध्ये 100 पेक्षा जास्त लोकल वाढवू शकतात. तसेच मध्य रेल्वेच्या प्रवासी क्षमतेमध्ये अडीच ते तीन लाख प्रवासी वाढतील. त्यामुळेच हे काम महत्त्वपूर्ण असून येणाऱ्या काळात 72 तासांचा सर्वात मोठा आणि शेवटचा जम्बो मेगाब्लॉक घेऊन फेब्रुवारीमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. 


आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका झाली आहे. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचं काम गेली दहा वर्षे रखडलं होतं. मार्च 2019 अंतिम मुदत असतानाही त्यात अनेक वेळा बदल झाला होता. त्यानंतर जून 2021 ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. पण करोना आणि परिणामी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कमी मनुष्यबळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या कामात पुन्हा अडथळा आला. त्यामुळे आता मार्च 2022 च्या आधी ही मार्गिका पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.


ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच 6 फेब्रुवारीपासून ही मार्गिका खुली होईल. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत मिळेल, असं अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी सांगितलं आहे. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा