Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र अजूनही दोन मेगाब्लॉक शिल्लक असल्याचं मध्य रेल्वेने सांगितलं आहे. यापैकी पहिला मेगा ब्लॉक येत्या शनिवारी आणि रविवारी घेण्यात येईल. तर दुसरा मेगाब्लॉक हा 72 तासांचा असेल, जो फेब्रुवारीच्या चार ते सहा तारखेच्या दरम्यान घेण्यात येण्याची शक्यता आहे. या दोन मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असं एमआरव्हीसीनं सांगितलं आहे.
मध्य रेल्वेवर या शनिवारी आणि रविवारी पुन्हा एकदा चौदा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर असणार आहे. डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगा ब्लॉकची सुरुवात शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजून वीस मिनिटांनी होईल, तर रविवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटंपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अप फास्ट मार्गीकेवर दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 वाजून 30 मिनिटांनी संपेल. या मेगा ब्लॉकच्या दरम्यान अप आणि डाऊन दिशेला धीम्यामार्गीकेवर लोकल धावतील. शनिवारी या ब्लॉगच्या आधी दादर येथून सुटणाऱ्या जलद लोकल आणि एक्सप्रेस अकरा वाजून 40 मिनिटांपासून ते रात्री दोन वाजेपर्यंत माटुंगा आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान डाऊन स्लो लाईन वरून धावतील. तर ब्लॉक सुरू झाल्यानंतर दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी इथून सुटणाऱ्या एक्सप्रेस, तसेच फास्ट लोकल या मुलुंड आणि कल्याणच्या दरम्यान डाऊन स्लो लाईनवर डायव्हर्ट करण्यात येतील. असं असलं तरी मेगा ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर एक्सप्रेस आणि मेल गाड्या थांबणार नाहीत, असं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे.
शनिवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉक दरम्यान दिवा आणि ठाणे स्थानकात जलद मार्गिका जोडण्याचं काम केलं जाईल. तर जो 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, त्या दरम्यान सर्वाधिक काम हे दिवा स्थानकाजवळ करण्यात येईल. 72 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकनंतर मध्य रेल्वेला लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण स्टेशनपर्यंत सहा मार्गिका उपलब्ध होतील. सध्या पारसिकच्या बोगद्यातून जाणाऱ्या मार्गिका ब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका म्हणून वापरात येईल. त्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस पासून ते कल्याणपर्यंत याच मार्गांवरून धावतील. परिणामी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी याची मदत होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Local Mega Block : 4 ते 6 फेब्रुवारी, मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगाब्लॉक; पाचवी-सहावी मार्गिका 6 फेब्रुवारीला खुली होणार
- Mumbai Local Update : लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या 'या' पावलामुळे प्रवास होणार सुखकर
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा