शेतकरी संकटात! राज ठाकरे म्हणाले, ही आणीबाणीची वेळ, ओला दुष्काळ जाहीर करा
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी सरकारकडे केली आहे.
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. गुलाबी वादळामुळं झालेल्या पावसानं काटे मात्र शेतकऱ्यांच्या अंगाला रुतले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी सरकारकडे केली आहे.
Maharashtra Rain : आभाळ फाटलं! 'गुलाब' वादळाचे 'काटे' शेतकऱ्यांच्या अंगाला, बळीराजाचं अतोनात नुकसान
राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा!
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra pic.twitter.com/fnCIswerMO
ते म्हणाले की, अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला 50 हजार रूपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे, असं ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत रहातील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधव वर्गाकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकानुसार राज्य सरकारकडे करत आहे, असं ते म्हणाले.