Best Fare Hike : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांच्या (Mumbai) खिशाला झळ बसणार आहे. मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या 'बेस्ट'चा प्रवास (Best Ticket New Rate)  महागला आहे. बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. आजपासून बेस्ट पाससाठी नवे दर लागू करण्यात आले आहेत. 1 मार्चपासून बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपये तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांनी वाढ लागू करण्यात येत आहे. त्यामुळे आजपासून मासिक पाससाठी 750 रुपयांऐवजी 80 रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणजे मासिक पासच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली आहे. तर, दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली असून त्यासाठी तुम्हाला आता 50 रुपयांऐवजी 60 रुपये मोजावे लागणार आहेत. 


'बेस्ट'चा प्रवास महागला


बेस्टने पासच्या दरात वाढ केल्याने आजपासून खर्चात भर पडणार आहे, मात्र, बेस्टच्या तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. फक्त दैनंदिन पास आणि मासिक पासच्या दरात वाढ झाली आहे, असं बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बेस्टने विद्यार्थ्यांसाठीची सवलत कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांसाठी 200 रुपयांच्या मासिक पासमध्ये अमर्याद बस फेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. बेस्टच्या नव्याने लागू करण्यात आलेल्या दरानुसार, 42 ऐवजी आता 18 पास असतील. यामध्ये 6 रुपये, 13 रुपये, 19 रुपये आणि 25 रुपये वातानुकूलित आणि विनावातानुकूलित बस प्रवास भाड्यासाठी साप्ताहिक आणि मासिक पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 


लाखो मुंबईकरांना फटका


बेस्ट बसही मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन आहे. दररोज लाखो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. यामुळे पास दरवाढीचा लाखो मुंबईकरांना फटका बसला आहे. दररोज 35 लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात, त्यामुळे या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बेस्टचे उत्पन्न आणि महसूल वाढवण्यासाठी आणि प्रवाशांसाठीच्या पास पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याची दरात बदल करण्यात आल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितलं आहे. बेस्टच्या नव्या दरांमुळे सुमारे 10 लाख पासधारकांना आर्थिक फटका बसणार आहे. 


पालिकेकडून मदत घेत कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची वेळ


बेस्ट सध्या तोट्यात आहे. बेस्ट प्रशासनाला पालिकेकडून आर्थिक सहाय्य घेत कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. बेस्टच्या किमान तिकीटाचा दर पाच रुपये केल्यानंतर उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, अशी बेस्ट प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र, बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 35 लाखांवरून 25 लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट सफल झालं नाही. त्यामुळे आता बेस्ट प्रशासनाने दैनंदिन आणि मासिक पासच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाची रिमझिम, काही भागात तापमानात वाढ! पुढील 24 तास पावसाचा अंदाज कायम