Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत सर्वात मोठी बातमी समोर येत असून, सरकारचा तीन कलमी प्रस्ताव मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय काल रात्री रांजणगाव गणपती येथे आले होते. अडीच तासांनंतर त्यांना जरांगे यांची वेळ मिळाली. त्यानंतर पहाटे चार वाजता चर्चेला सुरुवात झाली. यावेळी दीड तास चर्चा झाली. चर्चेदरम्यान राज्य सरकारचा तीन कलमी प्रस्ताव अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवला. परंतु, जरांगे यांनी सरकारचा तीन कलमी प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


सरकारचा तीन कलमी प्रस्ताव..



  • 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या ही सकारात्मक बाब असल्याचे मान्य व्हावे. 

  • गावागावात आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

  • क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यातून आरक्षणाला दिशा मिळणार आहे. म्हणून मुंबईचा दौरा टाळा असेही आवाहन अधिकाऱ्यांनी केले. 


जरांगे पाटील आपल्या भुमिकेवर ठाम 


जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार कामाला लागले असून, कोणत्याही परिस्थितीत जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. विभागीय आयुक्त यांच्या शिष्टमंडळाला देखील त्यांनी आपली भूमिका बोलून दाखवली. त्यामुळे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सरकारचे प्रतिनिधी तेथून बाहेर पडले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


ओबीसी- मराठा आरक्षणाच्या वादात मध्यस्थी करायला तयार; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य