मुंबई : अप्पर वर्धा (Wardha) प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात आक्रमक भूमिका घेतली आहे. अप्पर वर्धा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. तर या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मंत्रालयात उपस्थित असलेल्या पोलिसांकडून करण्यात आला. आम्ही अनेक दिवसांपासून निवदेन देत असून आमच्या मागण्या अजून मान्य होत नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, यावेळी मंत्रालयामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. 


"नाहीतर आम्ही आत्महत्या करु"


अप्पर वर्धा प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांनी मंत्रालयामध्ये आक्रमक पवित्रा घेतला. गेले अनेक दिवस हे शेतकरी त्याचं निवेदन घेऊन मंत्रालयात येत होते, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, असं आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर उद्यापर्यंत जर काही चर्चा केली नाही, तर आम्ही आत्महत्या करू असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे. सुदैवाने पोलिसांना या सर्व शेतकऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. 


नेमकं काय घडलं?


मंत्रालयामध्ये मंगळवार (29 ऑगस्ट) सकाळपासूनच एक मेडिकल कॅम्प सुरू होता. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. पण अचानक काही शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर धाव घेतली. त्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ माजली. त्यानंतर या आंदोलकांनी त्यांची सर्व परिपत्रकं खाली फेकण्यास सुरुवात केली.


दरम्यान आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळी मंत्रालयात उपस्थित असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे त्याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. 


का घेतला आंदोलनाचा पवित्रा?


मागील 103 दिवसांपासून हे शेतकरी मागण्यात करत असल्याचं म्हटलं जात आहे. अप्पर वर्धा प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या सरकारला दिल्या आहेत. पण त्याबदल्यात शासनाकडून मिळणारी हक्काच्या मोबादल्याची रक्कम अजूनही मिळाली नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं असून त्यासाठी ही आक्रमक भूमिका घेतली असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


शेतकऱ्यांचं म्हणणं काय?


आम्ही ज्या मागण्या करत आहोत, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या मिळवून द्याव्यात अशी देखील मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं असून यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणती भूमिका हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Savitribai Phule Pune University : मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून घेतले पैसे; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील लाचखोर कर्मचाऱ्याचं अखेर निलंबन