मुंबई : निवडणुका जवळ येताच राजकीय पक्षांच्या बैठका वाढू लागल्या आहेत. येत्या दोन दिवसात इंडियाची बैठक (India Meeting) मुंबईत होत आहे. इंडियाच्या बैठकीचे यजमानपद ठाकरेंकडे असणार आहे पण  बैठकीसह मुंबई फिरण्याचा काही नेत्यांचा प्लॅन आहे. कारण काही नेते आपल्या फॅमिलीसह येत असल्याची माहिती आहे


कुणाला देवदर्शन करायचंय तर कुणाच्या फॅमिलीला शॅापिंगला जायचंय  तर काही जणं मुंबईत पर्यटनाचाही प्लॅन करत आहेत. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत इंडियाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी जवळपास देशातले 27 पक्षांचे प्रमुख नेते यामध्ये सहभागी होत आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.  मुंबईत अंबांनीपासून ते बिग बी अमिताभ बच्चनपर्यंत,  धारावीच्या झोपडपट्टीपासून ते उंच उंच टॅावरपर्यंत,  हिंदू मुस्लिम शीख दलित असे विविध पंथाचे लोक राहतात.  त्यामुळे बॅालिवूड बिझनेसमॅन अथांग समुद्र, मुंबईतली विविध मंदिरं पाहण्याचा मोह नेत्यांच्या कुटुंबियांना असणारच त्यामुळे कुणाला मुंबादेवीचं दर्शन घ्यायचे तर कुणाला सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्याचा प्लॅनिंग सुरु आहे.


आयोजकांची डोकेदुखी वाढली


देशातले एवढं सगळे नेते एकत्र येणार आहे. मुंबईत फेरफटका मारणार हे तर स्वभाविक आहे. पण या सर्व नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची चिंता आयोजकांना पडली आहे. कारण नेते आले की त्यांचा लवाजमा आला जवळपास 150 पेक्षा जास्त नेते या बैठकीत सहभागी होणारआहेत. त्यापैकी काही नेते आपल्या कुटुंबियांसह येण्याचा प्लॅन करत आहे त्यामुळे आयोजकांची डोकुदुखी वाढत चालली आहे. 


इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी खास भोजनाचे आयोजन


31 ऑगस्टला सायंकाळी सहा ते साडेसहा देशातील इंडिया आघाडीमधील पक्षातील नेत्यांचं मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल मध्ये स्वागत केले जाणार. 31 ऑगस्ट साडे 6 नंतर पुढे इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरण व अनौपचारिक  बैठक होणार आहे. 31 ऑगस्टला रात्री आठ वाजता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देशभरातून आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी खास डिनरचे आयोजन केले आहे. 1 सप्टेंबर सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसकडून इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी खास दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे.  


कोणते नेते मुंबई दौऱ्यावर?


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी,  नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती आदी नेते उपस्थित राहणार आहेत. एवढे नेते येणार त्यात त्यांची फॅमिली येणार म्हंटलं तर मुंबईत एक फेरफटका तर होणारच आहे, त्यात हॅाटेल्स, स्ट्रिट फूड, देवदर्शन, शॉपिंग करायचे प्लॅन्स काही नेत्यांनी केले आहेत आता या पुढील काही दिवस मुंबईच्या रस्त्यावर कोण कोण दिसतंय हे पाहावं लागेल. 


हे ही वाचा :


Mumbai INDIA Meeting : मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची जय्यत तयारी, कसा असणार कार्यक्रम?