मुंबई : गणेशोत्सवाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत . गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या महाकाय मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत. बाप्पाची मूर्ती नेताना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून वाजतगाजत मिरवणुका काढण्यात येत आहेत.  मात्र गणेश आगमन मार्गावरील तब्बल 13 पूल धोकादायक असल्याने या पुलावरून जाताना काळजी घ्यावी, जास्त वेळ थांबू नये असा इशारा पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे रुळांवरील पुलांची संख्या सर्वाधिक आहे. 


या पुलांवरून जाताना सावधान



  • महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज 

  • प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर ब्रीज 

  • दादर-टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज 

  • करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज 

  • मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज 

  • सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज 

  • फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज 

  • केनडी रेल्वे पूल 

  • फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज 

  • बेलासीस मुंबई सेंट्रलजवळील ब्रीज 

  • घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज


कार्यशाळेतून मूर्ती मंडपामध्ये नेत असताना रस्त्यावर गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आगमन मिरवणुकांमध्ये रस्त्यावर  वाहतूक खोळंबते.  पुलांच्या या यादीत सर्वाधिक रेल्वे ब्रिजचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  करी रोड स्टेशनजवळील पूल, चिंचपोकळी स्थानकजवळील पूल, मंडलिक पूल या  पुलांवर एकाच वेळी 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या पूल विभागाकडून करण्यात आले आहे. 


मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा POP मूर्तीची मुभा


मुंबईत 12 हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं तर 1 लाख 90 हजार ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये मंडप बांधून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांना पालिकेची रीतसर परवानगी घेणं बंधनकारक असतं. मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी 'एक खिडकी' पद्धतीने ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी राज्य सरकार, पालिका आणि समन्वय समितीच्या बैठकीनुसार यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आणि उंच बनवण्याचा मार्ग मोकळा झाला असताना पालिकेच्या ऑनलाईन हमीपत्रात मात्र 4 फूट आणि पर्यारवणपूरक मूर्तीची अट घालण्यात आल्याने मंडळं संभ्रमात होती. यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यातही अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समितीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार काल ही बैठक पार पडली, ज्यात प्रतिज्ञापत्रातून 4 फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तींच्या बंधनाची अट हटवली आहे.