पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने (Savitribai Phule Pune University) लुटारु कर्मचाऱ्यावर कडक कारवाई केली आहे. मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची लूट करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे आणि कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. 


नेमकं काय घडलं होतं?


ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजल्या जाणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून दोन दिवसांपूर्वी धक्कादायक प्रकार समोर आला होता. विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करत असल्याचं समोर आलं होतं. या सगळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मार्कशीटसाठी चार हजार रुपये मागत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडे केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी तीन हजार रुपये या कर्मचाऱ्याला दिले होते. ज्या नोटा दिल्या त्या नोटांच्या नंबरचा फोटो या विद्यार्थ्यांनी काढून ठेवला होता.


हा सगळा प्रकार घडल्यानंतर कर्मचाऱ्याकडून त्याच लाच म्हणून घेतलेल्या नोटा परत मागितल्या आणि याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. मार्कशीट मागणारा प्रथम भंडारी हा विद्यार्थी बीएचं शिक्षण घेत आहे. याच विद्यार्थ्याकडून नेवासे नावाच्या कर्मचाऱ्याने पैसे घेतले असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याकडे चार हजार रुपये मागितले होते मात्र तीन हजार रुपये घेतल्याचं समोर आलं होतं. या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची शाहनिशा करुन विद्यापीठ प्रशासनाने या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई केली आहे. कर्मचाऱ्याचं थेट निलंबन करण्यात आलं आहे. अभाविपनेदेखील याविरोधात तक्रार दिली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आरोप


विद्यापीठातील विद्यार्थी मार्कशीट किंवा अन्य कोणत्याही कागदपत्रासाठी विद्यापीठातील संबंधित विभागाकडे जात असतात मात्र या विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरं दिले जातात किंवा त्यांना रोज चकरा मारायला लावत असल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागतो आणि त्यांचा वेळही वाया जातो. त्यासोबतच पैशाचीही मागणी करुन विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pune PMPML Bus : चालक बनला देवदूत! PMPML बसचा ब्रेक फेल झाला अन् चालकाने बस झाडावर आदळली; प्रवाशांचा वाचवला जीव