मुंबई : वर्षभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावी बोर्ड अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवला जात असताना फारसा बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीला वेळ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण न होणे, सराव परीक्षा घेता न येणे, लिखाणच्या बाबतीत सराव नसणे असे अनेक प्रश्न या परीक्षेदरम्यान वर्षभर उपस्थित झाले. आता अशा परिस्थितीत अवघ्या महिन्यांवर बोर्ड परीक्षा आलेली असताना दिलासा म्हणून दहावी-बारावीतील 30 लाख विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) त्यांच्या संकेतस्थळावर दहावी बारावीतील विषयांचे ऑनलाइन प्रश्‍नपेढी (question bank) उपलब्ध करून दिले गेले आहेत. हे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना प्रश्नप्रकारांचा सराव व्हावा म्हणून देण्यात आले असून यातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, असे एससीईआरटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एससीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


दहावीसाठी 16 लाख तर बारावीसाठी 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, त्यांच्या मनातील कोरोनाची भिती दूर होईल, यादृष्टीने नियोजन करण्यासाठी सल्लागार समिती नियुक्‍त केली आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव करता येईल, त्यांना स्वयंअध्ययनासाठी मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत.


मागील काही दिवसांपासून एससीईआरटी विषयावर प्रश्नपेढी संच तयार करण्याचे काम करत होते. इयत्ता दहावी बोर्डाच्या अभ्यासक्रमातील गणित भाग 1, इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोल यातील विषयाचे प्रश्नसंच अपलोड करण्यात आले आहेत. तर बारावी बोर्ड परीक्षेचे वाणिज्य शाखेचे गणित, इतिहास, इंग्रजी, विज्ञान शाखेच्या गणित, रसायनशास्त्र जीवशास्त्र, इंग्रजी आणि कला शाखेचे  इंग्रजी, इतिहास भूगोल, गणित विषयाचे प्रश्नसंच अपलोड करण्यात आले आहेत. इतर विषयांचे प्रश्नसंच लवकरच विद्यार्थ्यांसाठी अपलोड केले जाणार असल्याची माहिती उपसंचालक विकास गरड यांनी दिली.


प्रत्येक विषयांच्या घटकांवर किमान 15 ते 20 प्रश्‍न, असा प्रत्येक विषयांचा प्रश्‍नसंच असणार आहे. सोबतच, कोणता प्रश्न किती गुणांसाठी परीक्षेला येऊ शकतो, तो कसा सोडवला गेला पाहिजे याची समज आणि सराव विद्यार्थ्यांना होणार आहे. गणित, विज्ञान, भाषा या विषयांवर प्रश्नसंचाचा विशेष भर असेल शिवाय, विद्यार्थ्यांना युट्युब आणि सह्याद्री वाहिनीवर देखील याबाबत बोर्ड परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यत मार्गदर्शन केले जाणार आहे.


यावर्षी शाळा बंद असल्याने अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवला गेला, त्यात अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाला तर अजूनही काही ठिकाणी अभयसक्रम पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना फारसा ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्याने शिवाय प्रश्नपत्रिकांचे स्वरूप स्पष्ट नसल्याने हे प्रश्नसंच देण्यात येत आहेत. विदयार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांचे का प्राधान्याने सुरु असून यामुळे विद्यार्थ्यांना मदतच होईल अशी प्रतिक्रिया एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :