मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी सचिन वाझे प्रकरणात केलेला आरोप आणि त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्या भोवती आलेलं संशयाचं वर्तुळ यामुळं आपल्या वतीनं स्पष्टीकरण देत राणे यांना उत्तर देण्यासाठी म्हणून वरुण सरदेसाईंनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याची बाब प्रकर्षानं अधेरेखित केली. 


यावेळी त्यांनी आपल्याबाबतची काही खासगी माहिती पत्रकारांपुढे मांडली. युवासेनेचं काम करण्यासोबतच मी वडिलांसोबत त्याच्या व्यवसायात हातभार लावतो असं म्हणत आपण सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित कुटुंबातून आलो आहोत ही बाब अधोरेखित करत त्यांनी नारायण राणे, नितेश राणे यांच्या मागील काही महिन्यांत झालेल्या पत्रकार परिषदांचा आधार घेत राणे पिता-पुत्रांवर निशाणा साधला. 


आपल्यावर सचिन वाझे प्रकरणात करण्यात आलेले आरोप, हे गंभीर स्वरुपाचे असून हे आरोप कोणत्याही तपास यंत्रणेच्या माध्यमातून सिद्ध करुन दाखवावेत. अन्यथा चुकीच्या आरोपांबाबत माफी न मागितल्यास सात दिवसांच्या कालावधीनंतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यासाठी त्यांनी तयार रहावं, असा इशारा सरदेसाई यांनी दिला. आरोप सिद्ध करण्यासाठी भाजपला किती कालावधी देत आहात, या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी ही बाब स्पष्ट केली. 


Sachin Vaze | सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी


भाजप आमदार नितेश राणे यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्यात झालेल्या संभाषणाची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली. वरुण सरदेसाईंसोबतच्या संबंधांमुळे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझे यांची वकिली करत नव्हते ना? असा सवाल विचारत नितेश राणेंनी थेट निशाणा साधला. याशिवाय, मुंबईतील एका शिवसेना नेत्याचं टेलिग्राम चॅट आहेत. तेही तपासून घेण्याची मागणी नितेश राणे यांनी केली.


दरम्यान, 'मला राजकारणाची आवड आहे. म्हणून मी युवासेनेचं, शिवसेनेचं काम करतो. आज जे काही घाणेरडे आरोप माझ्यावर करण्यात आले, अशी काम करण्याची माझी इच्छा नाही आणि माझ्या हातून तसं घडणारही नाही. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटंबाच्या पार्श्वभूमीबाबत सारं सर्वश्रुत आहेच. मग अगदी त्यांची ती सुरूवातीची गँग असो किंवा नंतर त्यांच्यावर दाखल झालेले खून, अपहरण, खंडणीसारखे गंभीर असोत. या सगळ्याचा पाढा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत मांडला आहे, तो रेकॉर्डवर देखील आहे', असं म्हणत सरदेसाई यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली. 


वरुण सरदेसाई यांच्यासमवेत पत्रकार परिषदेसाठी उपस्थि असणाऱ्या अनिल परब यांनीदेखील यावेळी पश्चिम उपनगरातील शिवसेनेच्या बड्या नेत्याचं संभाषण समोर आल्याच्या आरोपा प्रतिक्रिया देत म्हटलं, 'नितेश राणे यांनी केलेले आरोप पाहता सरदेसाई यांनी सांगितल्यानुसार हे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे. कोणत्याही संस्थेने आमची चौकशी करावी, जो कोणी पश्चिम उपनगरातील नेता आहे त्याचं नाव पुढे करावं. फक्त खोटे आरोप करुन कोणाचंही नाव पुढे करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला त्यांनाच उत्तर द्यावं लागेल'.