मुंबई : "अरे मी कोण आहे तुला माहिती नाही, तुला बघून घेईन" हे वाक्य रस्त्यावरील वादांत हमखास आपल्या कानी पडतं. मात्र, दारूच्या नशेत एका ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याला हे वाक्य ऐकवत शिविगाळ करणं एका वकिलाला चांगलंच महागात पडलंय. योगेंद्र सिंह असं या 35 वर्षीय वकिलाचं नाव आहे. या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोणतंही कारण दिसत नसल्याचं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं या वकिलास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. 


साल 2018 मध्ये योगेंद्र सिंह विरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 353 (कर्तव्य बजावत असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला), 323 (दुखापतीच्या हेतून मारहाण करणं), 504 (समजातील शांतता भंग करणं), 506 (गुन्हेगारी प्रवृत्ती पसरवणं) यासह बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट मधील कलम 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय घडली होती घटना?
2 नोव्हेंबर 2017 मध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बांद्रा कुर्ला काँप्लेक्स इथल्या 'बटरफ्लाय' बार समोर एक व्यक्ती महिलांशी छेडछाड करत असल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानुसार बीकेसी मोबाईल व्हॅनवर ड्युटीवर असलेले सचिन पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तिथं पोहचले. रात्रीचे 11 वाजून 40 मिनिटं झाली होती. त्यावेळी काळा शर्ट परिधान केलेली एक व्यक्ती तिथं रिक्षावाल्यासोबत मारहाण करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. तेव्हा पाटील यांनी तातडीनं त्यात हस्तक्षेप केला. 


त्यावर योगेंद्र सिंह यांनी पाटील यांनाच धक्काबुक्की करत शिविगाळ देण्यास सुरूवात केली. आणि म्हटले की, "अरे तुला माहिती नाही मी कोण आहे?, मी हायकोर्टात वकील आहे, तुझी वर्दी उतरवून टाकेन". पोलिसांनी सिंह यांच्यासह त्या रिक्षावाल्यासही ताब्यात घेतलं. वैद्यकीय चाचणी केली असता योगेंद्र सिंह हे नशेत असल्याचा अहवालही प्राप्त झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सिंह याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.