Maharashtra Politics Congress: ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची (Central Agencies) भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मुख्य व्यवसाय झाला असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. भाजपकडून सुरू असलेला हा प्रकार लोकशाहीत फार काळ टिकणार नाही असेही पटोले यांनी सांगितले. 


पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. इंग्रजांनी हुकूमशाही कारभार केला त्याला जनता घाबरली नाही. आता स्वंतत्र भारतात भाजपा इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच पद्धतीने कारभार करू पाहत  आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडतानाही भाजपाकडून याच पद्धतीचा अवलंब केला. भाजपाने कारवाईच्या कितीही धमक्या दिल्या तरी महाविकास आघाडीचे नेते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत असेही त्यांनी म्हटले. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत. त्यावर सरकारकडे उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देऊन विरोधकांना घाबरवण्याचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. ईडी सरकारची उलटी गिनती सुरु झाली असून जनतेचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू, असेही नाना पटोले म्हणाले.


विदर्भातील अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यात तातडीने मदत पोहचवा


वैनगंगा नदीच्या कोपामुळे भंडारा जिल्ह्यातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. शिवारात पाणी साचल्याने धान पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मोहाडी, लाखांदूर, पवनी या तालुक्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. येथे त्वरित मदतकार्य पोहोचवण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. अतिवृष्टीमुळे राज्यात गोंदिया, भंडारा, गडचिरोली भागात पाणी साचले आहे, घरे पडली आहेत, शेती उद्धवस्त झाली आहे, अन्नदाता अडचणीत आला आहे त्यावर चर्चा झाली पाहिजे. यावर सरकारला निवेदन करण्याचे आदेश द्यावेत असे नाना पटोले म्हणाले.