Maharashtra Monsoon Assembly Session Live Updates : आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येणार आहेत. आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. दरम्यान आता विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्यामुळे स्त्री शिक्षण, स्त्री हक्काला बळ मिळेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासह आज अधिवेशनात नवनिर्वाचित मंत्र्याचा परिचय करण्यात आला.


अधिवेशनात पहिल्या दिवशी मंत्र्यांचा परिचय


शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नव्या सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांच्या परिचय करुन देण्यात आला. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची ओळख करुन देण्यात आली. त्यानंतर काही वेळाने सभागृह स्थगित करण्यात आलं.


25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर


आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज विधीमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


विरोधकांचा सरकारवर निशाणा


विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कसं असेल याची झलक सुरुवातीलाच पाहायला मिळाली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करत शिंदे-फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला.


17 ते 25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार


विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. 17 ते 25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे 18 जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.