मुंबई: राष्ट्रवादीचा एक बडा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यासोबत तुरुंगात जाणार, लवकरच त्याचं नाव आपण पत्रकार परिषद घेऊन लवकरच उघड करणार असल्याचं भाजप नेते मोहित कंबोज यांनी सांगितलंय. या नेत्याच्या सिंचन घोटाळ्याची फाईल 2019 साली बंद करण्यात आली होती असं स्पष्ट संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या बेनामी कंपन्या, त्यांच्या गर्लफेंडच्या नावावर असलेली संपत्ती, भ्रष्टाचाराची माहिती आपण देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मोहित कंबोज यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. 


मोहित कंबोज यांनी आज तीन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, एनसीपीचा एक बडा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुखांप्रमाणे तुरुंगात जाणार आहे. 






दुसऱ्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज यांनी त्याबद्दल अधिक सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात की, राज्यातील सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्याची फाईल परमबीर सिंह यांच्या काळात, 2019 साली बंद करण्यात आली होती. 


 






तिसऱ्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज यांनी थोडीशी सविस्तर माहिती देत आपली दिशा स्पष्ट केली आहे. ते म्हणतात की, "लवकरच आपण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार असून त्या नेत्याची भारतातील संपत्ती, देशाबाहेरील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावरील संपत्ती, त्याने मंत्रीपदावर असताना केलेला भ्रष्टाचार, त्याच्या कुटुंबाच्या संपत्तीची यादी याची माहिती देणार आहे."


 






या संबंधी एक पत्रकार परिषद घेऊन आपण लवकरच माहिती देणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचा तो बडा नेता कोण यावर चर्चा सुरू आहे.