Uddhav Thackeray : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P.Nadda) यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिवस फिरले की तुमचे काय होईल याचा विचार भाजपने करावा असा  इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेना संपवून दाखवण्याचा प्रयत्न करून तरी पाहा असे म्हणत भाजपकडून प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


रविवारी, शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रविवारी पाटण्यात केलेल्या भाषणातील वक्तव्याचा समाचार घेतला. नड्डा यांनी देशातील घराणेशाही प्रादेशिक पक्ष संपवणार असल्याचे वक्तव्य केले.  हे वक्तव्य म्हणजे देशाला एकछत्री कारभाराकडे, हुकूमशाहीकडे नेणारे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 


राजकारणात हे बुद्धीबळासारखे असल्याचे म्हटले जाते. मात्र, सध्याच्या राजकारणात बुद्धीचा नव्हे तर बळाचा वापर सुरू आहे. बळाचा वापर करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की दिवस हे फिरतात. दिवस फिरले तर तुमचं काय होईल, याचा विचार भाजपने करण्याची आवश्यकता असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आता सुरू असलेले राजकारण हे घृणास्पद असल्याचे उद्धव यांनी म्हटले.


देशातील राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यावर आता लोकांनीच त्यांना आपल्या देशातील भविष्य कसं असावं, त्याला मदत करायची का,  हे ठरवण्याची वेळ आली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


भाजप नेमका वंश कोणता?


भाजपमध्ये इतर पक्षातून काम करणारे येत आहेत, हे मान्य करतात. त्यामुळे आता भाजपचा तरी नेमका वंश तरी कोणता हे त्यांनी सांगावे असे उद्धव यांनी म्हटले. राजकारणात आपल्यासोबत येतील ते आपलं हे समजू शकतो. पण आपल्यासोबत येतील ते गुलाम आणि गुलामांचे काम संपले की त्यांना टाकून दुसरे गुलाम येतील अशी कृती केली जात असल्याचा आरोप उद्धव यांनी केला. 


नड्डा काय म्हटले होते?


महाराष्ट्रात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली असताना दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.  महाराष्ट्रातून घराणेशाही आधारीत शिवसेनाही (Shivsena) संपत चालली असून केवळ भाजपच राहणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले. रविवारी पाटणामध्ये भाजपच्या (BJP) कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 


नड्डा यांनी भाजपची ताकद वाढत असून देशात भाजपच राहणार असल्याचे वक्तव्य केले. नड्डा यांनी म्हटले की, भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजपविरोधात लढण्यासाठी आता कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलाच नाही. काँग्रेस 40 वर्षानंतरही भाजपला आव्हान देऊ शकत नाही असेही नड्डा यांनी म्हटले. पक्षाची विचारधारा मजबूत असून लोक ज्या पक्षात 20 वर्ष राहिलीत, तो पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत, असेही नड्डा यांनी म्हटले. 


भाजपची लढाई वंशवाद आणि परिवारवादाशी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा घराणेशाहीतला पक्ष आहे. तर, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी दोन हात करत आहोत. ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचा पक्ष हा एका व्यक्तीचा पक्ष आहे.  महाराष्ट्रातही शिवसेना आता संपत असून पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेसदेखील आता बहिण-भावांचा पक्ष झाला असल्याची टीका नड्डा यांनी केली.