Uddhav Thackeray Press Conference : शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना काय भूमिका घेणार, संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली अटकेची कारवाई ही शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं समजलं जातं.


शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली. काल (31 जुलै) दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली.


उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसैनिकांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर भाष्य केलं होतं. तर शिवसेनेतून वेगळे झालेल्या शिंदे गटाने तसंच भाजपने देखील संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली होती. परंतु शिवसेनेची अधिकृत भूमिका समोर आली नव्हती. संजय राऊत सातत्याने शिवसेनेची बाजू मांडत होते. त्यामुळे आता शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, काय बोलणार याकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.


उद्धव ठाकरेंकडून संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट


खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. ही वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. या भेटीत उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच शिवसेना आणि आपण स्वत: तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट होती. भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राऊत कुटुंब खिडकीत आलं होतं. संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी, दोन मुलींना उद्धव ठाकरे यांना निरोप दिला.