Aaditya Thackeray On Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. संजय राऊतांना जामीन मिळणार की त्यांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Case) संजय राऊतांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. दरम्यान राऊत यांच्या अटकेनंतर पहिल्यांदाच ठाकरे परिवाराची (Thackeray Family) प्रतिक्रिया समोर आली आहे. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असं आदित्य ठाकरे यांनी चिपी विमानतळावर बोलताना म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला तळकोकणातून सुरुवात
एकीकडे संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला हादरा बसला असताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज तळकोकणातून त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहेत. आदित्य ठाकरे आज सकाळी चिपी विमानतळावर पोहोचले. यानंतर कुडाळ आणि सावंतवाडी इथं ते जाणार आहेत. सावंतवाडीत बंडखोर आमदार केसरकर यांच्या घरासमोरून रॅली काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात दुपारी शिवसेनेचा मेळावा होणार आहे.केसरकरांनी केलेल्या टीकेला सावंतवाडीतील मेळाव्यात आदित्य ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. याशिवाय राणे पिता-पुत्रांवर आदित्य ठाकरे टीका करणार का याचीही उत्सुकता आहे. संध्याकाळी आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात मेळावा आहे.
'शिव संवाद' यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक
दिवस पहिला, सोमवार 1 ऑगस्ट
- सकाळी 11.30 वाजता कुडाळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी 12.30 वाजता सावंतवाडी येथे मेळावा
- सायंकाळी 6.30 वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा
दिवस दुसरा, मंगळवार 2 ऑगस्ट
- सकाळी 10 वाजता कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना होणार
- दुपारी 12 वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा
- दुपारी 3.15 वाजता पाटण येथे शिव संवाद
- सायंकाळी 6.45 कात्रज येथे शिव संवाद
कोकणात पॉलिटिकल मंडे, आदित्य सिंधुदुर्गात तर भाजप नेत्यांचा रत्नागिरी दौरा
कोकणातला आजचा दिवस हा पॉलिटिकल मंडेच म्हणावा लागेल. कारण बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सावंतवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आदित्य यांच्या दौऱ्यावेळी सावंतवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन शिवसैनिकांकडून केले जाणार आहे. यावेळी आपल्या जाहीर भाषणात आदित्य ठाकरे नेमकं काय बोलतात? दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आतापर्यंतच्या टीकेला काय उत्तर देतात? हे पाहावं लागणार आहे.