Uddhav Thackeray Press Conference : "संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल मला निश्चित अभिमान आहे. संजय माझे जुने मित्र आहेत. मी आताच त्यांच्या कुटुंबियांना भेटून आलो. त्यांचा काय गुन्हा आहे, जे पटत नाही त्याविरोधात बोलतात. मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्यांचं वाक्य अतिशय चांगलं आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या अटकेसह, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली.

संजय राऊत यांना अटकशिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली. काल (31 जुलै) दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली.

जे पी नड्डा यांचं वक्तव्य निर्घृण आणि घृणास्पद"भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं वक्तव्य निर्घृण आणि घृणास्पद आहे. आपण राजकारणाची तुलना बुद्धिबळाशी करतो. पण सध्याचं राजकारण केवळ बळाचं आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. "आमची अस्मिता चिरडण्याचा भाजपचं काम सुरु आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं आणि विरोधकांना चिरडून टाकण्याचं काम भाजप करत आहे. जे पी नड्डा यांचे वक्तव्य हुकूमशाहीकडे नेणारं आहे. अडीच वर्षात डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा गेली नाही. काळ नेहमी बदलत असतो. तुमच्याकडे आज बळ आहे, पण दिवस फिरतात," असं उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटलं.

उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेटउद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मातोश्री यांच्यामध्ये दहा मिनिटं भेट झाली. या भेटीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आईंच्या तब्येतीची सखोल विचारपूस केली. त्यांच्या पत्नी तसेच मुली देखील या भेटीदरम्यान उपस्थित होत्या. 'काहीही काळजी करु नका, शिवसेना आणि मी स्वतः तुमच्यासोबत आहे,' असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी निघताना दिलं.